- संयुक्त समिती स्थापन करण्याचे उद्योगमंत्र्यांचे निर्देश..
- लघुउद्योग संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत उदय सामंत यांची एलबीटी, रस्ते, ड्रेनेज, वीज, सुरक्षा आणि औद्योगिक सुविधांवर चर्चा….
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १९ ऑगस्ट २०२६) :- पिंपरी-चिंचवड औद्योगिक परिसरातील वर्षानुवर्षे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची मुंबई मंत्रालयातील दालनात मंगळवारी (दि. १८) बैठक घेतली. औद्योगिक परिसरातील समस्यांवर चाकणच्या धर्तीवर संयुक्त समिती स्थापन करून संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक पिंपरी-चिंचवडमध्ये घेण्याचे निर्देश सामंत यांनी दिले.
बैठकीला संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे, सचिव जयंत कड, संचालक संजय सातव, नवनाथ वायाळ, भारत नरवडे, महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी आणि एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल खेमनार उपस्थित होते.
महापालिकेशी संबंधित एलबीटीच्या नोटिसा रद्द करणे, टी-२०१ पुनर्वसन प्रकल्पातील गाळे वाटप, सीईटीपी प्रकल्पाची उभारणी, घातक कचऱ्याची विल्हेवाट, औद्योगिक परिसरातील खराब रस्ते आणि भुयारी गटार योजनेबाबत संघटनेने प्रश्न मांडले. एमआयडीसीकडे औद्योगिक परिसरातील अनधिकृत झोपडपट्ट्या व भंगार दुकाने हटविणे, नाल्यांवरील अतिक्रमणे दूर करणे आणि महावितरणसाठी आवश्यक भूखंड उपलब्ध करून देण्याच्या मागण्या करण्यात आल्या.
औद्योगिक परिसरासाठी नवीन वीज सबस्टेशन उभारणे, जुनी वीजवाहिनी यंत्रणा अद्ययावत करणे आणि नवीन डीपीआर कार्यान्वित करण्याची मागणीही करण्यात आली. तसेच अनधिकृत माथाडी संघटनांकडून उद्योजकांना होणारा त्रास रोखण्यासाठी पोलिसांकडून कायमस्वरूपी गस्तीची व्यवस्था करण्याची मागणी करण्यात आली. पीएमआरडीएकडे सेक्टर ७ व १० मधील रखडलेले फॅसिलिटी सेंटर, ट्रान्सफर चार्जेस कमी करणे आणि सबस्टेशनसाठी जागा उपलब्ध करून देण्याचे प्रश्न मांडण्यात आले.
या सर्व प्रश्नांवर संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांचा समावेश असलेली संयुक्त समिती स्थापन करून उद्योगमंत्र्यांच्या उपस्थितीत लवकरच महापालिकेत बैठक घेण्याचे निर्देश सामंत यांनी दिल्याने औद्योगिक क्षेत्रातील प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्याच्या आशा निर्माण झाल्या आहेत.

















