न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २० ऑगस्ट २०२६) :- पिंपरी-चिंचवड शहरातील ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. राजाभाऊ ऊर्फ मारुती कृष्णा सूर्यवंशी (वय ७५) यांचे अल्पशा आजाराने मंगळवारी (दि. १८) खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या निधनाने विधी क्षेत्रासह सामाजिक व धार्मिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.
पिंपरी येथे वास्तव्यास असलेल्या अॅड. सूर्यवंशी यांनी आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत विधी क्षेत्रात उल्लेखनीय काम केले. त्यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे कायदे सल्लागार म्हणूनही जबाबदारी सांभाळली होती. त्यांच्या कायद्यावरील अभ्यासामुळे आणि कार्यपद्धतीमुळे त्यांना शहरातील नामांकित विधिज्ञ म्हणून ओळखले जात होते.
अॅड. सूर्यवंशी हे पुण्यातील धनकवडी येथील श्री शंकर महाराज मठाचे विश्वस्त म्हणूनही कार्यरत होते. त्यामुळे धार्मिक आणि सामाजिक क्षेत्रातही त्यांचा मोठा संपर्क होता.
त्यांच्या पश्चात तीन मुले अॅड. सारंग, अॅड. सागर आणि अॅड. विक्रांत, सुना तसेच नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर पिंपरी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विधी, सामाजिक, राजकीय आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.


















