- महामार्गापलीकडे झपाट्याने वाढणाऱ्या नव्या पुनावळेकडे महापालिकेचे दुर्लक्ष..
- नागरिकांच्या मूलभूत सुविधांचा प्रश्न ऐरणीवर…
मा. अशोक लोखंडे :- संपादक तथा प्रतिनिधी
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २४ ऑगस्ट २०२६) :- महामार्गाच्या पलीकडे असलेला नवीन पुनावळे परिसर वेगाने विस्तारत आहे. मोठमोठ्या गृहनिर्माण सोसायट्या, वाढती लोकसंख्या आणि नव्या वसाहतींमुळे परिसराचे रूप बदलत असले तरी नागरी सुविधांच्या बाबतीत मात्र पुनावळे अद्यापही मागेच असल्याची नागरिकांची भावना आहे. उद्याने, खेळाची मैदाने, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळ्याची ठिकाणे, पादचारी मार्ग, सार्वजनिक वाहतूक आणि मूलभूत सुविधा यांचा गंभीर अभाव येथे जाणवत आहे.
नवीन पुनावळे परिसरात लहान मुलांसाठी खेळण्याची व्यवस्था असलेली उद्याने नाहीत. ज्येष्ठ नागरिकांना निवांत बसण्यासाठी किंवा विरंगुळ्यासाठी स्वतंत्र केंद्रेही उपलब्ध नाहीत. अनेक ठिकाणी रस्त्यालगत सुरक्षित पदपथ नसल्याने पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून चालावे लागते.
सार्वजनिक वाहतुकीची स्थितीही समाधानकारक नाही. सध्या गायकवाडनगरपर्यंत महापालिकेची बससेवा उपलब्ध असली तरी अनेक ठिकाणी अधिकृत बसथांबेच उभारण्यात आलेले नाहीत. त्यामुळे बस नेमकी कुठे थांबणार, याचा अंदाज प्रवाशांना येत नाही. मुकाई चौक-रावेत आणि आकुर्डी रेल्वे स्थानक येथून सर्क्युलर पद्धतीने बससेवा सुरू करण्याची मागणी होत आहे. परिसरातील अंडरपास आणि दोन्ही बाजूंच्या सेवा रस्त्यांचा वापर करून मिनीबस सुरू केल्यास नागरिकांना मोठा दिलासा मिळू शकतो. मेट्रो स्थानकांपर्यंत स्वतंत्र फिडर सेवा सुरू करण्याचीही गरज आहे.
रिक्षा सेवेबाबतही नागरिकांच्या तक्रारी वाढत आहेत. मीटरप्रमाणे धावणाऱ्या रिक्षांसाठी नियोजित रिक्षा स्टँड नसल्याने काही रिक्षाचालकांकडून मनमानी भाडे आकारले जात असल्याचे सांगितले जाते. कमी अंतराच्या प्रवासासाठी नकार दिला जात असल्याने विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि महिलांची गैरसोय होत आहे.
पुनावळे गावठाणातील पोस्ट ऑफिसकडून अपेक्षित टपाल सेवा मिळत नसल्याचीही नागरिकांची तक्रार आहे. साधी पत्रे आणि इतर टपाल वेळेवर वितरित होत नसल्याने वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर नवीन पुनावळे परिसरासाठी स्वतंत्र आणि अद्ययावत पोस्ट ऑफिस सुरू करण्याची मागणी पुढे आली आहे.
महामार्गालगतचा सेवा रस्ता सध्या सिमेंट काँक्रीटीकरणाच्या माध्यमातून विकसित केला जात असला तरी या रस्त्यावर अद्याप पुरेशा प्रमाणात स्ट्रीट लाईटची व्यवस्था झालेली नाही. पावसाळ्यात पाणी साचू नये यासाठी प्रभावी स्टॉर्म वॉटर ड्रेनेज व्यवस्था उभारण्याची आवश्यकता आहे. महामार्ग आणि सेवा रस्त्यांच्या कडेला वृक्षारोपण करून परिसराचा पर्यावरणीय समतोल राखण्याचीही मागणी नागरिकांनी केली आहे.
भटक्या कुत्र्यांचा वाढता त्रास हा आणखी एक गंभीर प्रश्न आहे. दुचाकीस्वार, रिक्षाचालक, पादचारी आणि लहान मुलांना याचा धोका निर्माण होत आहे. या समस्येवर महापालिकेने प्रभावी उपाययोजना करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
महामार्गाच्या दोन्ही बाजूंना सलग संरक्षक कठडे उभारण्याचीही गरज आहे. काही ठिकाणी अनधिकृत पंक्चरची दुकाने आणि इतर व्यवसाय उभे राहिल्याने वाहतूक सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. तसेच आरएमसी आणि डंपरच्या अवजड वाहतुकीसाठी वेळेचे निर्बंध घालून वाहतूक व्यवस्थापन अधिक शिस्तबद्ध करण्याची मागणी होत आहे.
बाणेर, बालेवाडी, वारजे, कोथरूड आणि कात्रज या भागांतून निगडी, चिंचवड, पिंपरीमार्गे देहूरोड, वडगाव, कामशेत आणि लोणावळ्याकडे जाणाऱ्या बससेवांनी प्रवाशांना बसथांब्यासाठी सेवा रस्त्याचाच वापर करावा, याबाबत स्पष्ट सूचना देण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे जांबे, नेरे, गहुंजे आणि किवळे मार्गावरील बससेवाही सेवा रस्त्याचा वापर करतील, यासाठी नियोजन करावे, अशी मागणी आहे.
अंडरपास परिसरातील वाहतूक कोंडी हा तर नागरिकांसाठी रोजचाच डोकेदुखीचा विषय बनला आहे. सध्या वाहतूक पोलिसांकडून नियंत्रण केले जात असले तरी अनेक वाहनचालक नियम पाळत नसल्याचे दिसून येते. विशेषतः शनिवार-रविवार आणि कार्यालयीन वेळेत परिस्थिती अधिक बिकट होते. त्यामुळे अंडरपास परिसरात आधुनिक सिग्नल यंत्रणा उभारून वाहतुकीचे कायमस्वरूपी नियोजन करण्याची गरज आहे.
महामार्गाच्या पलीकडे उंच इमारती उभ्या राहत असल्या, नवीन वसाहती विस्तारत असल्या तरी त्या परिसराला आवश्यक नागरी सुविधा मिळत नसतील, तर हा विकास केवळ कागदावरच राहील. पुनावळेचा विस्तार वेगाने होत असताना नियोजन आणि सुविधा मात्र त्याच वेगाने पोहोचत नसल्याने विकासाच्या नकाशावर पुनावळे दिसते, मग मूलभूत सुविधांच्या यादीत ते इतके ‘उणावळे’ का?, असा सवाल जाणकार नागरिक उपस्थित करीत आहेत.


















