- जपानमधील एशियन ड्रॅगन बोट चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदकांची कमाई..
- स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांच्याकडून कौतुकाची थाप…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २४ ऑगस्ट २०२६) :- जपानमधील क्योटांगो येथे झालेल्या ‘एशियन ड्रॅगन बोट चॅम्पियनशिप २०२६’मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत रौप्यपदकांची कमाई करणाऱ्या पिंपरी-चिंचवड वॉटर स्पोर्ट्स सेंटर, थेरगाव येथील खेळाडूंनी पिंपरी-चिंचवडच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांच्या पुढाकारातून पदकविजेत्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.
जपानमधील क्योटांगो येथे ६ ते ८ ऑगस्टदरम्यान झालेल्या या स्पर्धेत थेरगाव येथील पाच खेळाडूंनी डी१०-२०० मीटर आणि डी१०-५०० मीटर या दोन्ही प्रकारांत रौप्यपदक पटकावले. भारताचे प्रतिनिधित्व करत आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळविलेल्या या यशाची सभापती अभिषेक बारणे यांनी दखल घेतली. पिंपरी-चिंचवड वॉटर स्पोर्ट्स सेंटर, थेरगाव येथे आयोजित कार्यक्रमात बारणे यांच्या हस्ते पदकविजेत्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र राज्याच्या क्रीडा व युवा सेवा संचालनालयाचे उपसंचालक संजय सबनीस, महापालिकेच्या क्रीडा विभागाचे उपायुक्त पंकज पाटील, क्रीडा सभापती कैलास कुटे आणि क्रीडा समिती सदस्य तानाजी बारणे आदी उपस्थित होते.
भारतीय ड्रॅगन बोट संघाचे मुख्य प्रशिक्षक दत्ता पाटील यांचाही यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. पिंपरी-चिंचवडमधील खेळाडूंना राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी आवश्यक सुविधा आणि प्रोत्साहन देण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले. खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका सातत्याने पुढाकार घेत आहे. यापुढेही शहरातील खेळाडूंना आवश्यक ते सहकार्य आणि सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिका प्रयत्नशील राहील, असे आश्वासन सभापती अभिषेक बारणे यांनी यावेळी दिले.


















