- कासारवाडीतील घटनेप्रकरणी दोघांवर गुन्हा; पोलिसांकडून नोटीस…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
कासारवाडी (दि. २२ ऑगस्ट २०२६) :- कासारवाडी येथील ह प्रभाग क्षेत्रीय कार्यालय परिसरात पत्र्याच्या शेडवरील लाईटिंग काढण्याचे काम करताना उंचीवरून खाली पडल्याने राहुल साबळे या तरुणाचा मृत्यू झाला. या प्रकरणी कामाच्या ठिकाणी आवश्यक सुरक्षा व्यवस्था न केल्याचा आरोप करत दापोडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली. राहुल साबळे हा पत्र्याच्या शेडवरील लाईटिंग काढण्याचे काम करत होता. काम पूर्ण झाल्यानंतर तो खाली उतरत असताना त्याचा तोल गेला आणि तो उंचीवरून खाली पडला. या दुर्घटनेत त्याच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर त्याचा मृत्यू झाला.
या प्रकरणी विठ्ठल महादू साबळे (वय ६५, व्यवसाय सिक्युरिटी गार्ड, रा. विजयनगर, काळेवाडी) यांनी दापोडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांच्या नोंदीनुसार, कामासाठी संबंधितांकडून आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या नव्हत्या. कामगारांना सेफ्टी बेल्ट, सुरक्षा शूज, हेल्मेट तसेच सुरक्षित शिडी उपलब्ध करून देण्यात आली नसल्याचा आरोप आहे. निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी राम इंगळे आणि अब्दुल गुलाब बेग, दोघेही रा. काळेवाडी, यांना पोलिसांकडून नोटीस देण्यात आली आहे. दापोडी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम १०६ अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.


















