- स्मोकिंग झोन नसताना ग्राहकांना हुक्का पुरविल्याचा आरोप; पोलिसांची कारवाई…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
दिघी (दि. २२ ऑगस्ट २०२६) :- दिघीतील मॅग्झीन रोड परिसरातील हॉटेलमध्ये ग्राहकांना हर्बल हुक्का आणि तंबाखू हुक्का पुरविल्याप्रकरणी चौघांविरुद्ध दिघी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हॉटेलमध्ये स्वतंत्र स्मोकिंग झोनची व्यवस्था न करता जेवणाच्या टेबलवरच ग्राहकांना हुक्का उपलब्ध करून दिल्याचा आरोप आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २० ऑगस्ट रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास हॉटेल ट्री टाऊन, मॅग्झीनकडे जाणारा रोड, दिघी येथे ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी पोलिस शिपाई सोमनाथ बाळू खळसोडे यांनी फिर्याद दिली आहे.
आरोपींमध्ये अक्षय तापकीर, समशेर मनसुर अहमद, किशन कुमार श्रवण साहनी आणि अरबाज इम्रान अहमद यांचा समावेश आहे. हे आरोपी हॉटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकांना हर्बल हुक्का, तंबाखू हुक्का, स्नॅक्स, पाणी व शीतपेय उपलब्ध करून देत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
हॉटेलमध्ये हुक्क्यासाठी फॉईल पेपरवर जळता कोळसा ठेवण्यात आला होता. तसेच हुक्क्याचा धूर सर्वत्र पसरलेला आणि हुक्का फ्लेवरचा वास परिसरात असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. ग्राहकांच्या ये-जा करण्याच्या ठिकाणी जळता कोळसा नेला जात असल्याने ठिणग्यांमुळे हॉटेलमधील लाकडी टेबल व इतर साहित्याला आग लागण्याची शक्यता निर्माण होऊन मानवी जीवितास धोका निर्माण होऊ शकतो, असा आरोप पोलिसांनी केला आहे.
या प्रकरणी भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांसह सिगारेट व इतर तंबाखू उत्पादने अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वरे करीत आहेत.

















