- ‘उद्धवश्री पुरस्कार २०२६’ वितरण सोहळ्यात भाजपवर निशाणा..
- ताथवडे येथे विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववानांचा गौरव…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २१ ऑगस्ट २०२६) :- निवडणुका आल्या की लोकांना खोटी आश्वासने द्यायची, आमिषे दाखवायची आणि ईव्हीएम मशिन ताब्यात घेऊन निवडणूक जिंकायची, अशा पद्धतीने शिवसेनेने कधीही राजकारण केले नाही. ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या विचारावर शिवसेना आजही ठामपणे उभी आहे, अशा शब्दांत शिवसेना नेते तथा राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी ताथवडे येथे आज शुक्रवारी (दि. २१) भाजपवर अप्रत्यक्ष निशाणा साधला.

पिंपरी-चिंचवड शहर शिवसेना शहरप्रमुख चेतन महादेव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शहरामधील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा ‘उद्धवश्री पुरस्कार २०२६’ देऊन गौरव करण्यात आला. शिवसेना नेते संजय राऊत आणि शिवसेना सचिव तथा खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.
यावेळी वाकड, पुनावळे, ताथवडे, पिंपळे सौदागर, पिंपरी चिंचवड, पिंपळे निलख येथील युवक आणि युवतींनी शिवसेनेत प्रवेश केला त्यांचे खा. संजय राऊत यांनी स्वागत केले. यावेळी माजी आमदार गौतम चाबुकस्वार तसेच रोमी संधू, मावळ तालुका प्रमुख आशिष ठोंबरे, पिंपरी चिंचवड संपर्क प्रमुख लतिकाताई पाष्टे, सुशीला पवार, विजय सुळे, गजानन थरकुडे, सुनील सावंत, ज्ञानेश्वर शिंदे, ज्योती भावे, सचिन मगर, नितीन घोलप आदीं उपस्थित होते.
‘जिथे संकट, तिथे शिवसेना’- संजय राऊत…
संजय राऊत म्हणाले, औद्योगिक, कामगार, शिक्षण, क्रीडा अशा विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान व्यक्तींमुळे पिंपरी-चिंचवडची ओळख निर्माण झाली. या क्षेत्रात काम करणा-या व्यक्तींच्या कार्याचा सन्मान करण्याचे काम शिवसेना सातत्याने करत आली आहे. आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरे यांसारख्या सामाजिक उपक्रमांची संकल्पना समाजात रुजविण्यात शिवसेनेचे मोठे योगदान आहे. समाजातील प्रत्येक घटकाच्या सुख-दुःखात शिवसेना सहभागी झाली. ‘जिथे संकट, तिथे शिवसेना’ अशी या संघटनेची ओळख आहे. कोरोना काळात देशभर भीषण परिस्थिती होती. अशा संकटाच्या काळात शिवसेनेचे कार्यकर्ते घराघरांत जाऊन नागरिकांशी संवाद साधत होते. पडद्यामागे राहून समाजासाठी काम करणाऱ्या व्यक्तींना पुढे आणण्याचे काम शिवसेनेने केले आहे. सामाजिक कार्याला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी राजाश्रयाची गरज असते. त्यामुळेच शिवसेनेने समाजकारणासोबत राजकारणातही आपले स्थान निर्माण केले, असे राऊत यांनी सांगितले.
‘३६ हजार उद्योग बंद पडणे लाजिरवाणे’ – विनायक राऊत…
विनायक राऊत म्हणाले, भाजपच्या काळात या भागातील सुमारे ३६ हजार उद्योग बंद पडले असून, काही उद्योग परराज्यात स्थलांतरित झाले. ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्री मस्ती आल्यासारखे वागत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली. शिवसेनेने कायम सर्वसामान्यांचा आणि समाजातील प्रत्येक घटकाचा विचार करून काम केले आहे. त्यामुळेच शिवसेना आजही जनतेच्या मनात टिकून आहे. चेतन पवार यांनी पुरस्कारासाठी केलेली व्यक्तींची निवड अत्यंत योग्य असून, या कर्तृत्ववान व्यक्तींच्या कार्यातून इतरांनाही प्रेरणा मिळेल, असे विनायक राऊत यांनी सांगितले.
‘पुरस्कार म्हणजे त्यांच्या सामाजिक कार्याचा सन्मान’ – चेतन पवार…
पिंपरी चिंचवड शहर प्रमुख चेतन पवार यांनी स्वागत, प्रास्ताविक करताना सांगितले की, हा पुरस्कार म्हणजे त्यांच्या सामाजिक कार्याचा सन्मान आहे. यातील अनेकांनी कोरोना सारख्या जोखीम काळात देखील पुढे येऊन आपले कर्तव्य बजावले आहे.
‘उद्धवश्री’चे मानकरी…
विविध क्षेत्रांत कर्तृत्वाची छाप उमटविणाऱ्या मान्यवरांचा ‘उद्धवश्री पुरस्कार २०२६’ देऊन सन्मान करण्यात आला.डॉ. संतोष लाटकर (वैद्यकीय), डॉ. रोहन काटे (वैद्यकीय), प्रा. तुकाराम पाटील (साहित्यिक), काशिनाथ नखाते (कामगार), प्रीती वैद्य (सामाजिक), चांद पाशा अहमद हुसेन तांबोळी (क्रीडा) पै. योगेश्वर तापकीर (क्रीडा) भाग्यश्री मोरे (सामाजिक), रामदास काटे (कृषी) आणि डॉ. संजीव कुमार पाटील (कला), शौर्या भरणे (क्रीडा), रियाज शेख (कुस्ती) आणि भाग्यश्री मोरे (दिव्यांगांसाठी कार्य) यांचा “उद्धव श्री पुरस्कार २०२६” सन्मान करण्यात आला.

















