- ब्रेक न लागल्याने अपघात; चौघांना किरकोळ दुखापत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चाकण (दि. २२ ऑगस्ट २०२६) :- चाकण-तळेगाव चौक परिसरात एसटी बसची समोर उभ्या असलेल्या खासगी बसला पाठीमागून धडक बसल्याने झालेल्या अपघातात एसटी बसमधील चार प्रवासी किरकोळ जखमी झाले. ही घटना २१ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास एचपी पेट्रोल पंपाजवळ, आरती हॉटेल परिसरात घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शांतीलाल जगन्नाथ मोरे (वय ३८, रा. मंचर, ता. आंबेगाव) हे मंचर-पुणे-पुणे-नाशिक मार्गावरील एसटी बस क्रमांक एमएच १३ सीयू ८४७३वर ड्युटीवर होते. सकाळी सुमारे ९.५० वाजता एसटी बस चाकण-तळेगाव चौकात पोहोचली. तेथून प्रवाशांना घेऊन बस पुणे-नाशिक मार्गाने नाशिकच्या दिशेने जात होती.
आरती हॉटेलजवळ रस्त्यावर एक खासगी बस उभी असल्याचे चालकाच्या निदर्शनास आले. रस्त्यावर वाहतूक आणि गर्दी असल्याने एसटी बस डाव्या बाजूने पुढे नेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, समोर उभी असलेली खासगी बस दिसल्यानंतर एसटी बस थांबवण्याचा प्रयत्न केला असता बसचा ब्रेक न लागल्याने एसटी बसने खासगी बसला पाठीमागून जोरदार धडक दिली.
या अपघातात एसटी बसमधील शुभांगी पोपट चव्हाण (वय ४३, रा. नारायणगाव), नंदा बाळासाहेब शिंदे (वय ६३, रा. मंचर), लक्ष्मण दगडू तलवारे (वय ५०, रा. खेड) आणि महादेवी लक्ष्मण तलवारे (वय ४७, रा. खेड) यांना किरकोळ दुखापत झाली.
या प्रकरणी चाकण उत्तर पोलिस ठाण्यात चालक सोपान भारत कानवडे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम २८१, १२५(अ) तसेच मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि दगडे व पोहवा शिरसाट करीत आहेत.


















