- ‘यूथ की आवाज’मध्ये हजारो युवकांचा सहभाग..
- भाजयुमोचे माजी प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे यांचा युवकांना राष्ट्रनिर्मितीचा संदेश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २४ ऑगस्ट २०२६) :- ‘वंदे मातरम्’च्या घोषणांनी आणि देशभक्तीपर गीतांच्या स्वरांनी पुण्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसर राष्ट्रभक्तीच्या वातावरणाने भारावून गेला. ‘वंदे मातरम् कृती समिती, पुणे’च्या वतीने आयोजित ‘यूथ की आवाज’ या विशेष कार्यक्रमाला हजारो युवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या कार्यक्रमात भाजयुमोचे माजी प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे यांनी सहभाग घेत युवकांशी संवाद साधला.
‘वंदे मातरम्’ हे केवळ गीत नसून भारताच्या स्वातंत्र्यलढ्याला ऊर्जा देणारे आणि देशवासीयांना एकत्र बांधणारे राष्ट्रचेतनेचे प्रतीक आहे, असे मोरे यांनी आपल्या मनोगतात सांगितले. देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी युवकांनी केवळ घोषणा देऊन थांबू नये, तर सामाजिक आणि राष्ट्रीय जबाबदारी स्वीकारून विकसित भारताच्या उभारणीत सक्रिय योगदान द्यावे,” असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमानिमित्त काढण्यात आलेल्या रॅलीतही मोरे सहभागी झाले. हातात तिरंगा आणि ‘वंदे मातरम्’च्या घोषणांसह युवकांनी परिसर दणाणून सोडला. समारोपावेळी हजारो युवकांनी मोबाईलच्या प्रकाशात एकत्रित ‘वंदे मातरम्’चे गायन केले. देशभक्ती, राष्ट्रीय एकात्मता आणि युवकशक्तीचा प्रभावी संगम या कार्यक्रमातून अनुभवायला मिळाला.


















