- परिपत्रके, सूचना आणि प्रशासकीय आदेशांची स्वतंत्र फाईल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २४ ऑगस्ट २०२६) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध विभागांमधून जारी होणारे महत्त्वाचे कार्यालयीन आदेश, परिपत्रके, सूचना आणि प्रशासकीय निर्देश आता स्वतंत्रपणे संकलित करून जतन करण्यात येणार आहेत. यासाठी प्रत्येक विभागाने स्वतंत्र स्थायी आदेश अथवा कार्यालयीन आदेश फाईल तयार करून ती नियमित अद्ययावत ठेवावी, असे निर्देश महापालिका प्रशासनाने दिले आहेत.
सामान्य प्रशासन विभागाने याबाबत परिपत्रक प्रसिद्ध केले असून, आयुक्तांनी विभागप्रमुखांच्या आढावा बैठकीत दिलेल्या सूचनांनुसार ही कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. संबंधित फाईलमध्ये आदेशाचा क्रमांक, दिनांक, विषय आणि संबंधित विभाग अथवा शाखेची माहिती अनुक्रमणिकेसह नमूद करावी लागणार आहे.
सर्व कागदपत्रांची विषयानुसार आणि कालानुक्रमे मांडणी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. नवीन आदेश किंवा परिपत्रक जारी होताच त्याची तातडीने नोंद करून फाईलमध्ये समाविष्ट करावी लागेल. प्रत्येक विभागाने तयार केलेल्या अद्ययावत फाईलची प्रत सामान्य प्रशासन विभागाकडे अभिलेखासाठी पाठवावी. या कामाची जबाबदारी संबंधित अधिकारी किंवा कर्मचाऱ्यावर निश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सह आयुक्त मनोज लोणकर यांनी पाच दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.


















