- तात्पुरती डागडुजी नको; कायमस्वरूपी दर्जेदार रस्ता उभारा..
- चाकणकरांसह उद्योजकांची एकनाथ शिंदेंकडे आग्रही मागणी…
मा. अशोक लोखंडे :- संपादक तथा प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चाकण (दि. २४ ऑगस्ट २०२६) :- राज्यातील महत्त्वाच्या औद्योगिक पट्ट्यांपैकी एक असलेल्या चाकणकडे अनेक वर्षे पायाभूत सुविधांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष झाल्याच्या तक्रारी आहेत. आता मात्र परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर राज्य सरकारला प्रत्यक्ष चाकणमध्ये येऊन पाहणी करण्याची वेळ आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रविवारी (दि. २३) चाकण एमआयडीसी परिसराची पाहणी करत रस्ते, खड्डे, वाहतूक कोंडी, पाणीटंचाई आणि कचरा व्यवस्थापनावर अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना दिल्या. मात्र, चाकणला आदेशांची नव्हे तर प्रत्यक्ष कामांची गरज आहे, अशी प्रतिक्रिया उद्योजक आणि नागरिकांमधून उमटत आहे. काही दिवसांपूर्वी याच प्रश्नावर उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाइन बैठक झाली होती. त्यानंतर प्रत्यक्ष पाहणी दौरा झाला. बैठका, आढावे आणि सूचना यांची मालिका सुरू असली तरी चाकणच्या रस्त्यांवरील खड्डे मात्र अजूनही उद्योग आणि कामगारांच्या दैनंदिन प्रवासाला अडथळा ठरत आहेत.

तळेगाव-चाकण-शिक्रापूर या सुमारे ५४ किलोमीटरच्या मार्गाची अवस्था गंभीर असून अनेक ठिकाणी खड्ड्यांमुळे वाहतूक मंदावते. अपघातांचा धोका वाढतो आणि उद्योगांच्या मालवाहतुकीवरही त्याचा थेट परिणाम होतो. या रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजविण्याचे आदेश देण्यात आले असले तरी तात्पुरती डागडुजी करून प्रश्न मिटविणार की कायमस्वरूपी दर्जेदार रस्ता उभारणार? असा सवाल उपस्थित होत आहे.
पाणीटंचाईच्या प्रश्नावरही आता पुन्हा आश्वासनांची मालिका सुरू झाली आहे. जलसंपदा मंत्री गुलाबराव पाटील पुढील आठवड्यात चाकणला भेट देऊन परिस्थितीची पाहणी करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. जलजीवन मिशन प्राधिकरणाच्या माध्यमातून उपाययोजना करण्याचे नियोजन असले तरी वाढत्या उद्योगनगरीला आवश्यक असलेल्या पाण्याचा कायमस्वरूपी प्रश्न नेमका कधी सुटणार, याबाबत मात्र स्पष्ट कालबद्ध आराखडा अद्याप समोर आलेला नाही.
रस्ते, पाणी, वीज, वाहतूक आणि कचरा व्यवस्थापन या प्रत्येक प्रश्नासाठी वेगवेगळे विभाग जबाबदार असल्याने चाकणचा विकास अनेक वर्षांपासून विभागीय समन्वयाच्या अभावात अडकला आहे. पीएमआरडीए, एमआयडीसी, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि स्थानिक प्रशासन यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये नागरिक मात्र भरडले जात आहेत. दौऱ्यात रिंग रोडच्या कामाचीही पाहणी करण्यात आली असून एमआयडीसीतील अंतर्गत रस्त्यांची कामे मार्चअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.मार्चअखेरपर्यंत प्रत्यक्ष रस्ते तयार होणार की आणखी एका पाहणी दौऱ्यात पुन्हा त्याच खड्ड्यांकडे बोट दाखविले जाणार?
दरम्यान, या दौऱ्याला राजकीय रंगही चढला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार बाबाजी काळे या पाहणी दौऱ्यात उपस्थित होते. मागील आठवड्यात उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या बैठकीलाही त्यांनी उपस्थिती लावली होती. विशेष म्हणजे, आदित्य ठाकरे यांच्या चाकण दौऱ्यावेळी खासगी कामाचे कारण देत काळे मध्येच निघून गेल्याची चर्चा होती. त्यानंतर शिंदे आणि सामंत यांच्या बैठका व दौऱ्यांमधील त्यांची उपस्थिती राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.
चाकणच्या प्रश्नांवर सरकारची धावपळ सुरू झाली असली तरी उद्योगनगरीला पाहणी दौरे, बैठका आणि आदेशांपेक्षा ठोस निर्णय आणि त्याची वेळेत अंमलबजावणी अपेक्षित आहे. खड्डे बुजतील, पाणी येईल आणि वाहतूक सुरळीत होईल, या आश्वासनांपेक्षा चाकणकरांना आता प्रत्यक्ष बदल पाहायचा आहे. अन्यथा ‘उद्योगनगरीच्या विकासासाठी सरकार गंभीर’ हे वाक्यही आणखी एका सरकारी दौऱ्यापुरतेच मर्यादित राहण्याची भीती व्यक्त होत आहे.


















