- एनएचएआयच्या एलिव्हेटेड कॉरिडॉरसाठी भोसरीचा उड्डाणपूल हटविण्याची तयारी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २५ ऑगस्ट २०२६) :- निगडीतील भक्ती-शक्ती समूहशिल्प चौक ते चाकण या प्रस्तावित मेट्रो मार्गाचा सुधारित डीपीआर महापालिकेकडे सादर करण्यात आला आहे. सुमारे ४७ किलोमीटरच्या या मार्गावर ३४ स्थानके प्रस्तावित असून, त्यापैकी २८ स्थानके पिंपरी-चिंचवडमध्ये तर सहा स्थानके चाकण नगरपरिसरात असतील. या प्रकल्पाचा सुधारित अंदाजे खर्च १२ हजार ९३७ कोटी २३ लाख रुपये आहे.
निगडीपासून ट्रान्सपोर्टनगर, रावेत, पुनावळे, ताथवडे, वाकड, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, नाशिक फाटा, संत तुकारामनगर, भोसरी एमआयडीसीमार्गे हा मार्ग पुढे चाकणकडे जाणार आहे. वाकड येथे हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोशी जोडणी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे शहरातील प्रमुख औद्योगिक आणि आयटी परिसर मेट्रोच्या माध्यमातून जोडले जाणार आहेत.
दरम्यान, नाशिक फाटा-खेड मार्गावर एनएचएआयकडून ३० किलोमीटरचा आठपदरी एलिव्हेटेड कॉरिडॉर उभारला जाणार आहे. या प्रकल्पासाठी भोसरीतील राजमाता जिजाऊ उड्डाणपूल पाडण्याची माहिती सभेत देण्यात आली. मात्र, पूल कायम ठेवून पर्यायी मार्गाचा विचार करावा, अशी भूमिका महापौर रवी लांडगे यांनी मांडली आहे.
नगरसेवकांच्या सूचनांनुसार डीपीआरमध्ये आवश्यक बदल करून त्याचे पुन्हा सादरीकरण करण्यात येणार आहे.


















