- भाजप नगरसेवकांची पीएमआरडीएकडे मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २५ ऑगस्ट २०२६) :- पुणे मेट्रो लाईन क्रमांक ३ अंतर्गत वाकड परिसरात प्रस्तावित असलेल्या मेट्रो स्थानकाला ‘भुजबळ चौक मेट्रो स्टेशन’ असे नाव देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) महानगर आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले.
वाकडमधील भुजबळ चौक हा परिसराची स्थानिक ओळख निर्माण करणारा महत्त्वाचा भाग असल्याने प्रस्तावित मेट्रो स्थानकाला त्याचे नाव दिल्यास परिसराची ओळख अधिक ठळक होईल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. प्रशासनाने या मागणीचा सकारात्मक विचार करावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
यासोबतच वाकड परिसरातील प्रस्तावित डी.पी. रस्ते व शिवरस्त्यांच्या विकासकामांना गती देण्याची मागणी करण्यात आली. वाढत्या वाहतुकीच्या पार्श्वभूमीवर रस्ते आणि वाहतूक व्यवस्था सक्षम करून नागरिकांना अधिक चांगल्या दळणवळणाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणीही करण्यात आली.
यावेळी पिंपरी-चिंचवड उपाध्यक्ष राम वाकडकर, नगरसेविका श्रुती वाकडकर, नगरसेविका रेश्मा भुजबळ, नगरसेवक कुणाल वाव्हळकर आणि सामाजिक कार्यकर्ते प्रमोद चौधरी उपस्थित होते.


















