- उद्यान विभागाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २५ ऑगस्ट २०२६) :- महापालिका मुख्यालयाच्या शेजारी सुरू असलेल्या खासगी बांधकाम प्रकल्पात अडथळा ठरत असल्याचे कारण देत ५२ जुन्या वृक्षांची तोड करण्यात आल्याचा आरोप आम आदमी पार्टीने केला आहे. या वृक्षांचे सरासरी वय सुमारे १०४ वर्षे असल्याचा दावा ‘आप’ युवा आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष ऋषिकेश कानवटे यांनी केला.
एकूण ५२ पैकी ३३ वृक्ष मुळासकट काढण्यात आल्याने ते मृत झाल्याचे सांगण्यात आले. तर उर्वरित १९ वृक्षांचे पुनर्रोपण करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आल्याचा दावा आहे. वृक्षतोडीबाबत संबंधित बांधकाम व्यावसायिकाकडून प्रति वृक्ष १५ हजार रुपये याप्रमाणे २० लाख ७० हजार रुपयांची दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आल्याचेही सांगण्यात आले.
मात्र, केवळ दंड आकारून महापालिका जबाबदारीतून मुक्त होऊ शकत नाही, अशी भूमिका कानवटे यांनी मांडली. प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित बांधकाम व्यावसायिकावर कारवाई करावी तसेच दोषी अधिकाऱ्यांवरही कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला.


















