न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २९ ऑगस्ट २०२६) :- महिलेची माफी मागण्यासाठी तरुणाला रात्री चौकात बोलावून घेतल्यानंतर त्याच्यावर लाथा-बुक्क्यांसह कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना काळेवाडीतील पाचपीर चौकात घडली. याप्रकरणी काळेवाडी पोलिसांनी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून, आरोपी महिलेच्या मुसक्या आवळल्या आहेत.
सुंदरम लालचंद यादव (वय २५, रा. रहाटणी) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आशु मॅडम उर्फ ऐश्वर्या सुतार हिने तिच्या साथीदारांसोबत संगनमत करून २७ ऑगस्ट रोजी रात्री सुमारे १०.४५ वाजता यादव यांना फोन केला. महिलेची माफी मागण्यासाठी त्यांना पाचपीर चौकात बोलावून घेण्यात आले.
यादव तेथे आल्यानंतर आरोपी महिला आणि तिच्या पतीने त्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर महिलेच्या सांगण्यावरून आरोपी ओमकार याने कोयत्याने यादव यांच्या डोक्यात, डाव्या हातावर तसेच उजव्या कानाजवळ वार केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात यादव गंभीर जखमी झाले.
दरम्यान, अन्य तिघांनीही कमरेच्या पट्ट्याने तसेच लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणी आशु मॅडम उर्फ ऐश्वर्या सुतार हिला अटक करण्यात आली असून, अन्य आरोपींचा शोध सुरू आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मुजावर करीत आहेत.


















