- औंध मिलिटरी स्टेशन येथे सलग पाचव्या वर्षी भावस्पर्शी रक्षाबंधन उपक्रम…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २९ ऑगस्ट २०२६) :- देशाच्या संरक्षणासाठी अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या भारतीय संरक्षण दलातील अधिकारी व जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी उन्नती सोशल फाउंडेशनच्या वतीने औंध मिलिटरी स्टेशन येथे रक्षाबंधनाचा भावस्पर्शी उपक्रम आयोजित करण्यात आला. उन्नती सखी मंचच्या महिला सदस्यांनी जवानांच्या मनगटावर राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले.
सलग पाचव्या वर्षी हा उपक्रम राबविण्यात आला. कुटुंबापासून दूर राहून देशसेवा करणाऱ्या जवानांना समाजातील भगिनींच्या प्रेमाची व आपुलकीची जाणीव व्हावी, हा या उपक्रमामागील उद्देश आहे.
उन्नती सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सौ. कुंदाताई संजय भिसे म्हणाल्या, “जवान हेही कोणाचे तरी भाऊ, मुलगे आणि कुटुंबातील सदस्य आहेत. त्यांच्या त्यागाला सलाम करण्यासाठी राखी बांधणे ही आमच्यासाठी कृतज्ञतेची संधी आहे.”
यावेळी सुभेदार नवीन कुमार साहेब, निवृत्त सुभेदार मेजर संतोष पुरण वानखडे, सुभेदार मोहम्मद असद इकबाल, सुभेदार मेजर विनोद चव्हाण, हवालदार महेश प्रताप पात्र, हवालदार राजकुमार, सामाजिक कार्यकर्ते प्रतापराव भोसले तसेच उन्नती सखी मंचच्या सर्व महिला सदस्या उपस्थित होत्या.


















