न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० जून २०१९) :- भारतीय वायुदलात ग्रुप कॅप्टन असलेल्या अधिकाऱ्याच्या घरी चोरी करण्यासाठी नेपाळी नोकर दाम्पत्याने ८९ सिम कार्ड वापरल्याची माहिती समोर आली आहे. हे दोघेही सराईत गुन्हेगार असल्याचा संशय पोलिसांना आहे.
दरम्यान ८९ सिम कार्डसाठी देण्यात आलेली सगळी कागदपत्रं खोटी आहेत असंही पोलिसांनी सांगितलं आहे. ही कार्ड घेण्यासाठी गीता, लक्ष्मी ही दोन नावं सर्वाधिकवेळा वापरली गेली आहेत. गीता आणि महेश अशी या दोघांची नावं आहेत असं पोलिसांनी सांगितलं आहे.
या प्रकरणी प्राची दीपक नेरकर यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दरम्यान, पोलिसांच्या तांत्रिक तपासात या नोकर दाम्पत्याने तब्बल ८९ सिमकार्ड गुन्ह्यात वापरले असल्याचे सांगण्यात येत आहे. सर्व सिमकार्ड घेण्यासाठी नोकर दाम्पत्याने बोगस कागदपत्र वापरली असून ते सध्या परराज्यात असल्याचे आहेत. त्यांचा शोध घेतला जात आहे अशी माहिती पिंपरी पोलिसांनी दिली आहे. दोघे सराईत गुन्हेगार असल्याचा संशय पोलिसांना आहे.















