न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ जून २०१९) :- पिंपरी चिंचवड महापालिकेने अनधिकृत फ्लेक्स लावण्यास बंदी घातली असताना काळेवाडी येथे विद्यमान नगरसेवकाच्या वाढदिवसानिमित्त शेकडो अनधिकृत फ्लेक्स उभारण्यात आले आहेत. धोकादायक पद्धतीने उभारण्यात आलेल्या या फ्लेक्समुळे मोठा अपघात घडण्याची शक्यता असल्यामुळे या फ्लेक्सवर कारवाई करण्याची मागणी शिवशाही व्यापारी संघाचे प्रदेशाध्यक्ष युवराज दाखले यांनी केली आहे. यासंदर्भात दाखले यांनी आयुक्त श्रावण हार्डीकर यांना मेल करून तक्रार दाखल केली आहे.
दाखले म्हणाले की, शहरात अनधिकृत फ्लेक्स उभारण्यास बंदी असून शहरातील लोकप्रतिनिधींकडूनच हे आदेश पायदळी तुडवले जात आहेत. काळेवाडीत विद्यमान नगरसेवकाच्या वाढदिवसानिमित्त शेकडो विना परवाना फ्लेक्स लावण्यात आले असून, त्यातील अनेक फ्लेक्स धोकादायक पद्धतीने उभारण्यात आले आहे. त्यातील काही फ्लेक्स अतिशय धोकादायक पद्धतीने लावण्यात आले आहेत. त्यामुळे एखादा मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाने तातडीने या अनधिकृत फ्लेक्सवर कारवाई करावी. तसेच सदर विद्यमान नगरसेवकांकडून दंड वसूल करण्यात यावा. सदर अनधिकृत फ्लेक्समुळे काही अपघात घडल्यास त्या अपघाताची संपूर्ण जबाबदारी ही महापालिका प्रशासनाची व संबंधित नगरसेवकाची असेल, असा इशाराही दाखले यांनी आयुक्तांना यावेळी दिला आहे.















