न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. १० सप्टेंबर २०२६) :- देहू कॅम्प परिसरातील भारतीय सैन्याच्या प्रतिबंधित क्षेत्रात तारांचे कुंपण कापून अनधिकृत प्रवेश केल्याचा प्रकार समोर आला आहे. या ठिकाणी चंदनाचे झाड तोडून त्याचा गाभा चोरून नेल्याप्रकरणी तीन जणांविरुद्ध देहूरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना ९ सप्टेंबर रोजी पहाटे सव्वाएकच्या सुमारास देहू कॅम्प परिसरात घडली. मोनेश्वर पोहेश्वर सोनुवाल यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, रविंद्र बुवाजी मधे, अविनाश मधे आणि गोविंद कडाळे या संशयितांनी परिसरातील तारांचे कुंपण कापून आत प्रवेश केला. त्यानंतर प्रतिबंधित क्षेत्रातील सुमारे १० हजार रुपये किमतीच्या चंदनाच्या झाडाचा गाभा तोडून नेल्याचा आरोप आहे.
स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी चंदनाचे झाड परवानगीशिवाय तोडून चोरी केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देहूरोड पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.


















