न्यूज पीसीएमसी नेटवर्क
वाकड (दि. १० सप्टेंबर २०२६) :- ‘रामाचे मंदिर कुठे आहे? तुम्हाला देणगी करायची आहे,’ असे सांगत एका भामट्याने ८२ वर्षीय वृद्धाला बोलण्यात गुंतवले. त्यानंतर हातचलाखीने त्यांच्या हातातील तब्बल ७५ हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी काढून नेल्याचा प्रकार वाकडमध्ये घडला.
याप्रकरणी विठ्ठल केशव धवणे (वय ८२, रा. व्हिस्टेरिया सोसायटी, मारुंजी रोड, भूमकर चौक, वाकड) यांनी वाकड पोलिसांत फिर्याद दिली आहे.
८ सप्टेंबर रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास हा प्रकार घडला. पुणे हार्डवेअर दुकानाच्या समोरील साईटजवळ फिर्यादी असताना एक अनोळखी व्यक्ती त्यांच्याजवळ आला. अंदाजे ४० ते ४५ वर्षे वयाच्या या व्यक्तीने ‘रामाचे मंदिर कुठे आहे, तुम्हाला दान करायचे आहे,’ असे सांगून फिर्यादीच्या उजव्या हातावर ५०० रुपयांची नोट ठेवली.
त्यानंतर नजर चुकवून आरोपीने त्यांच्या हातातील सोन्याच्या अंगठीशेजारील बोटातून अंगठी काढून घेतली आणि पसार झाला. चोरी गेलेल्या अंगठीची किंमत सुमारे ७५ हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या प्रकरणी वाकड पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू आहे.


















