- गुन्हे शाखा युनिट-३ची कारवाई; २० वर्षीय आरोपीला अटक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. १० सप्टेंबर २०२६) :- पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत वाढलेल्या मोटारसायकल चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी गुन्हे शाखा युनिट-३ने कारवाई करत तीन मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. या कारवाईत एका २० वर्षीय आरोपीला अटक करून त्याच्याकडून सुमारे १ लाख ७५ हजार रुपये किमतीच्या चोरीच्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ सप्टेंबर रोजी मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा समांतर तपास सुरू असताना पोलीस अंमलदार अजित रुपनवर व त्यांच्या पथकाला चिखली, घरकुल परिसरात रेकॉर्डवरील एक आरोपी चोरीच्या मोटारसायकलींची विल्हेवाट लावत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घरकुल परिसरात सापळा रचून जॉर्डन राजेश साळवे (वय २०, रा. घरकुल, चिखली) याला ताब्यात घेतले.
त्याच्याकडील होंडा अॅक्टिव्हा (MH 14 FQ 1683) बाबत चौकशी केली असता त्याने सदर वाहन घरकुल, चिखली येथून चोरी केल्याची कबुली दिली. तसेच रुपीनगर येथून हिरो स्प्लेंडर (MH 14 GZ 1237) आणि दापोडी परिसरातून आणखी एक स्प्लेंडर मोटारसायकल चोरी केल्याचे पोलिसांना सांगितले.
या कारवाईत चिखली पोलीस ठाण्यातील गुन्हा क्रमांक ५७७/२०२६ आणि ६१९/२०२६ तसेच दापोडी पोलीस ठाण्यातील गुन्हा क्रमांक २५९/२०२६, भा.न्या.सं. कलम ३०३(२) अन्वये दाखल असलेले तीन गुन्हे उघडकीस आले आहेत.
पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या सूचनेनुसार ही कारवाई करण्यात आली. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-३चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक गोसावी, जावळे तसेच पोलीस अंमलदार सोमनाथ बोऱ्हाडे, स्वप्निल महाले, अजित रुपनवर, तुषार वराडे आणि दिलीप राठोड यांच्या पथकाने ही कारवाई केली.

















