- आरटीओ, स्पीड कॅमेरे आणि नाकाबंदी चुकवण्यासाठी लढवली अनोखी शक्कल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. १० सप्टेंबर २०२६) :- आरटीओची कारवाई, स्पीड कॅमेरे आणि पोलिसांची नाकाबंदी चुकवण्यासाठी टोयोटा फॉर्च्युनरच्या नंबरप्लेटमध्ये फेरफार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी वाकड पोलिसांनी वाहनचालक-मालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
विजय भगवान दगडे (रा. ताथवडे, पुणे) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्या ताब्यातील एमएच १४ एलएन ४८८८ क्रमांकाच्या टोयोटा फॉर्च्युनरच्या मागील बाजूच्या नंबरप्लेटवर आरटीओची परवानगी नसलेली नंबर प्लेट दिसू नये, अशा पद्धतीने बनावट यंत्रणा बसवण्यात आल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, नंबरप्लेट लपविण्यासाठी अथवा तिचे स्वरूप बदलण्यासाठी इलेक्ट्रॉनिक/यांत्रिक यंत्रणेचा वापर करण्यात आला होता. त्यामुळे वाहतूक शाखेचे चलन, आरटीओची कारवाई, स्पीड कॅमेरे, पोलिसांची नाकाबंदी तसेच दंडात्मक व कायदेशीर कारवाई टाळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.
या प्रकारातून वाहनाची खरी ओळख लपवून शासनाची फसवणूक करण्याचा प्रयत्न झाल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. याप्रकरणी वाकड पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.


















