- ३० सप्टेंबरपूर्वी नोटिसा, १ ऑक्टोबरपासून जप्तीची कारवाई…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. १० सप्टेंबर २०२६) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेने आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी निश्चित केलेले १३०० कोटी रुपयांचे मालमत्ता कर वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी थकबाकीदारांवर नियोजनबद्ध कारवाई करण्याचे निर्देश अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी दिले.
महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. बिगरनिवासी, औद्योगिक, मिश्र आणि मोकळ्या जागांच्या थकबाकी वसुलीला प्राधान्य देत स्वतंत्र पथके तयार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. ३० सप्टेंबरपूर्वी थकबाकीदारांना नोटिसा बजावून, १ ऑक्टोबरपासून जप्तीची कारवाई सुरू करण्याचे निर्देशही देण्यात आले.
दरम्यान, १ एप्रिल ते १० सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत ५८४ कोटी ४९ लाख ४५ हजार २२८ रुपयांचा मालमत्ता कर जमा झाला आहे. ३० सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन कर भरल्यास सामान्य करावर ४ टक्के सवलत मिळणार आहे. नागरिकांनी मुदतीपूर्वी कर भरून सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सांडभोर यांनी केले.


















