न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. १० सप्टेंबर २०२६) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने गणेशोत्सव २०२६ च्या अनुषंगाने शहरातील गणेश मंडळांना परवाने देण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. क्षेत्रीय कार्यालयनिहाय आतापर्यंत एकूण १११ गणेश मंडळांना परवाने देण्यात आले आहेत. तसेच गणेशमूर्ती विसर्जनासाठी शहरात एकूण १०४ विसर्जन ठिकाणांची व्यवस्था करण्यात आली आहे.
क्षेत्रीय कार्यालयनिहाय परवानगी देण्यात आलेल्या गणेश मंडळांची संख्या पुढीलप्रमाणे आहे – ब क्षेत्रीय कार्यालय २३, क क्षेत्रीय कार्यालय २, ड क्षेत्रीय कार्यालय १६, इ क्षेत्रीय कार्यालय १५, फ क्षेत्रीय कार्यालय १७, ग क्षेत्रीय कार्यालय २०, ह क्षेत्रीय कार्यालय १५, ज क्षेत्रीय कार्यालय २ आणि ल क्षेत्रीय कार्यालय १, अशी एकूण १११ मंडळांना परवानगी देण्यात आली आहे.
गणेशमूर्ती विसर्जनासाठी क्षेत्रीय कार्यालयनिहाय अ क्षेत्रीय कार्यालय १०, ब १४, क १२, ड १२, इ १३, फ ११, ग ६, ह १२, ज ९ आणि ल ५ अशा एकूण १०४ विसर्जन ठिकाणांची व्यवस्था करण्यात आली आहे.
गणेशोत्सव काळात नागरिकांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, तसेच गणेशमूर्तींचे विसर्जन सुरक्षित व पर्यावरणपूरक पद्धतीने करता यावे, यासाठी महानगरपालिका प्रशासनाकडून आवश्यक नियोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी महानगरपालिकेने उपलब्ध करून दिलेल्या विसर्जन ठिकाणांचा वापर करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
“गणेशोत्सव हा आपल्या शहरातील नागरिकांच्या श्रद्धा आणि उत्साहाचा सण आहे. हा उत्सव आनंदमय, शिस्तबद्ध आणि सुरक्षित वातावरणात पार पडावा, यासाठी महानगरपालिकेच्या माध्यमातून आवश्यक नियोजन करण्यात आले आहे. गणेश मंडळांना परवाने देण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून, विसर्जनासाठीही मोठ्या प्रमाणात व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांनी पर्यावरणपूरक पद्धतीने गणेशमूर्तींचे विसर्जन करून महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे.”
-महापौर रवि लांडगे.“गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सोयीसाठी महानगरपालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांच्या माध्यमातून आवश्यक नियोजन करण्यात आले आहे. गणेश मंडळांना परवाने देण्यासोबतच विसर्जनासाठी १०४ ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. विसर्जनाच्या ठिकाणी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच नागरिकांना कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी प्रशासनाकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सुरक्षित आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा.”
-आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी.

















