- सहा रस्त्यांचे रुंदीकरण सुरू..
- पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १५ सप्टेंबर २०२६) :- चाकण आणि आळंदी परिसरातील वाढत्या औद्योगिक वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) सहा प्रमुख रस्त्यांच्या रुंदीकरणाचे काम हाती घेतले आहे. या कामामुळे वाहनचालकांना अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी काही मार्गांवरील वाहतूक एकेरी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. याबाबत पीएमआरडीएकडून पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांना प्रस्ताव देण्यात आला असून, वाहनचालकांसाठी पर्यायी मार्गही निश्चित करण्यात आले आहेत.
चाकण-आळंदी औद्योगिक पट्ट्यात अवजड तसेच हलक्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे संबंधित रस्त्यांची रुंदी ५.५० ते १० मीटरपर्यंत वाढविण्यात येत आहे. आवश्यक ठिकाणी काँक्रीटीकरण, तर काही भागात डांबरीकरण केले जाणार आहे. या कामांमुळे १० सप्टेंबरपासून वाहतुकीत तात्पुरते बदल लागू करण्याचे नियोजन आहे.
चिखली-मोई मार्गावरील १.३० किलोमीटरच्या रस्त्याचे काम ३० नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. या काळात मोशी-चिंबळी-पुणे-नाशिक फाटा-कुरुळी-निघोजे-मोई या मार्गाचा वापर करण्याची सूचना करण्यात आली आहे.
कुरुळी फाटा ते निघोजे या १.९० किलोमीटरच्या रस्त्याचे काम ३० डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. या मार्गासाठी निघोजे-जय हनुमान चौक-एमआयडीसी फेज-३-वोक्सवॅगन रस्ता-पुणे-नाशिक रस्ता हा पर्याय देण्यात आला आहे.
खालूंब्रे ते हुंदाई कंपनीदरम्यानच्या १.३० किलोमीटर रस्त्याचे काम १० डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. या कालावधीत सावरदरी-एचपी चौक-तळेगाव-चाकण रस्त्याचा पर्यायी मार्ग वापरता येणार आहे.
निघोजे गाव ते एमआयडीसी फेज-३ दरम्यानची वाहतूक निघोजे गावठाणमार्गे जय हनुमान चौकातून एमआयडीसी फेज-३ कडे वळविण्याची तयारी करण्यात आली आहे.
तर, चाकण फाटा ते आळंदी हा तब्बल आठ किलोमीटरचा रस्ताही रुंदीकरणाच्या कामात आहे. या मार्गावरील वाहनांसाठी आळंदी बाह्यवळण रस्ता-चिंबळी-पुणे-नाशिक रस्ता हा पर्याय सुचविण्यात आला आहे. बहुतांश रस्त्यांची कामे नोव्हेंबर ते डिसेंबरअखेर पूर्ण करण्याचे पीएमआरडीएचे उद्दिष्ट आहे.


















