- निगडीतील साईनाथनगरमधील दुर्घटना..
- घंटागाडीची दुचाकीला धडक; पाच वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १५ सप्टेंबर २०२६) :- गणेशोत्सवाच्या मिरवणुकीचा जल्लोष सुरू असतानाच निगडीतील साईनाथनगर परिसरात दुर्दैवी घटना घडली. कचरा उचलण्यासाठी आलेल्या महिंद्रा सुप्रो वाहनाने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत जवळच असलेली पाच वर्षांची मुलगी वाहनाखाली आल्याने तिचा मृत्यू झाला. सोमवार (दि. १४) दुपारी सव्वाबाराच्या सुमारास औदुंबर सोसायटीसमोर ही घटना घडली. संस्कृती भागवत बिरादार (वय ५, रा. औदुंबर सोसायटी, यमुनानगर, निगडी) असे मृत चिमुकलीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, साईनाथनगर भागात कचरा संकलन करण्यासाठी महिंद्रा सुप्रो वाहन आले होते. औदुंबर सोसायटीसमोर वाहनाची रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या दुचाकीला जोरदार धडक झाली. धडकेनंतर संस्कृती या वाहनाच्या चाकाखाली आली. गंभीर जखमी अवस्थेत तिला नागरिकांनी तातडीने निगडीतील लोकमान्य रुग्णालयात नेले. मात्र, वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
अपघाताच्या वेळी परिसरात गणेश मिरवणूक सुरू होती. त्यामुळे घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी संस्कृतीच्या तोंडून ‘गणपती बाप्पा मोरया’ असा जयघोष ऐकू आला आणि त्यानंतर तिचा मृत्यू झाला. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच निगडी पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून कचरा संकलन वाहन ताब्यात घेतले. वाहनचालक राहुल प्रल्हाद चव्हाण (वय २८, रा. साने चौक, चिखली) आणि त्याचा साथीदार राजू कुमार गायकवाड (वय ३८, रा. राजनगर, ओटास्कीम, निगडी) यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, अपघात नेमका कसा घडला याचा पुढील तपास निगडी पोलिस करीत आहेत.


















