“चित्रपटातून विचार मांडला, मैदानावर बदल घडवून दाखवला; तरीही प्रतिसादाची प्रतीक्षा का?”…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १५ सप्टेंबर २०२६) :- ‘कचरा साफ करण्याबरोबरच कचरा टाकणाऱ्या माणसाची मानसिकता बदलण्यासाठी काय करता येईल?’ या प्रश्नातून ‘अवकारिका’ चित्रपटाची निर्मिती झाल्याचे निर्माता-दिग्दर्शक सीए अरविंद जनार्दन भोसले यांनी सांगितले.
पाच मिनिटांच्या लघुपटाच्या संकल्पनेतून पुढे पूर्ण लांबीचा चित्रपट साकारला. स्वच्छतेचा संदेश मनोरंजनाच्या माध्यमातून देताना प्रेक्षकांनी विचार करावा, हा उद्देश असल्याचे भोसले यांनी स्पष्ट केले. चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून कैलाश खेर यांच्या आवाजातील गाण्यामुळे देशभरात स्वच्छतेच्या उपक्रमांमध्ये त्याचा वापर होत असल्याचे त्यांनी सांगितले.
चित्रपट हिंदीतही तयार करून स्वच्छ भारत मिशनकडे सहकार्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. मात्र, पाठपुरावा करूनही अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, ‘माझं मैदान, स्वच्छ मैदान’ उपक्रमांतर्गत पिंपरी-चिंचवडमधील डॉ. हेडगेवार मैदानावर दहा महिन्यांपासून जनजागृती करण्यात आली. नागरिकांच्या सहभागातून मैदान ९९ टक्के स्वच्छ ठेवण्यात यश आल्याचा दावा भोसले यांनी केला. या उपक्रमाचा अहवालही स्वच्छ भारत मिशनला सादर करण्यात आला आहे.

















