न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १५ सप्टेंबर २०२६) :- जुन्या आर्थिक व्यवहारातून झालेल्या वादाचे पर्यवसान थेट पिस्तुलातून गोळीबारात झाले. चिखलीतील जाधववाडी परिसरात एका तरुणावर गोळी झाडून त्याला जखमी केल्याप्रकरणी चिखली पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
रवि धनाजी घोगरे (वय २६, रा. जांबुळकर चौक, चिखली) यांनी याबाबत पोलिसांत तक्रार दिली आहे. स्वप्नील कांताराम जाधव (वय ३७) आणि रोशन मच्छींद्र पिंगळे (वय २८), दोघेही जाधववाडी, चिखली येथील रहिवासी, अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि. १४) पहाटे दोनच्या सुमारास जाधववाडी परिसरातील ओलिओ हॉटेल सिटी प्राईड स्कूलजवळ हा प्रकार घडला. जुन्या आर्थिक देवाणघेवाणीवरून आरोपी आणि फिर्यादी यांच्यात वाद झाला. त्यावेळी आरोपी स्वप्नील जाधव याने जवळील पिस्तुल काढून फिर्यादीच्या दिशेने गोळी झाडली. या हल्ल्यात रवि घोगरे जखमी झाले.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर चिखली पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. या प्रकरणी खुनाचा प्रयत्न आणि इतर संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस करीत आहेत.


















