न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १५ सप्टेंबर २०२६) :- काळेवाडी पोलीस ठाण्याच्या समोरच मध्यरात्री पाच जणांमध्ये जोरदार वाद होऊन हाणामारी झाल्याची घटना घडली. शिवीगाळ आणि मारामारीमुळे सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी काळेवाडी पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल करून नोटिसा बजावल्या आहेत.
राजू विश्वनाथ अल्हाट (वय ५३), लक्ष्मण बबन अल्हाट (वय ४७), योगेश राजू मंडलिक (वय २५), दिनेश संतोष वळू (वय २४) आणि पंकज राजू आल्हाट (वय २७) अशी संबंधितांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवार (दि. १४) पहाटे एकच्या सुमारास थेरगाव येथील काळेवाडी पोलीस ठाण्यासमोरील सार्वजनिक रस्त्यावर हा प्रकार घडला. काही कारणावरून संबंधितांमध्ये वाद सुरू झाला. त्यानंतर परस्परांना शिवीगाळ करत हाताने मारहाण करण्यात आली. या प्रकारामुळे रस्त्यावर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिस हवालदार रणधीर माणिकराव भोसले यांनी याबाबत तक्रार दाखल केली. सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग करणाऱ्या या प्रकाराची नोंद करून पोलिसांनी संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली आहे.


















