- स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांच्या हस्ते शुभारंभ…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १५ सप्टेंबर २०२६) :- थेरगाव येथील रुग्णालयात उपचार घेत असलेले रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी इस्कॉन संस्थेमार्फत सुरू करण्यात आलेल्या सात्विक भोजनाच्या (प्रसाद) उपक्रमाचा शुभारंभ पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला. आजारपण आणि संकटाच्या काळात रुग्णाला वैद्यकीय उपचारांसोबतच वेळेवर मिळणाऱ्या पौष्टिक आणि सात्विक आहाराची अत्यंत आवश्यकता असते, असे प्रतिपादन अभिषेक बारणे यांनी यावेळी केले.
हा उपक्रम अधिक प्रभावीपणे आणि सातत्याने राबवण्यासाठी ‘सीएसआर’ फंडाचा उत्तम वापर करण्यात आला असून, या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत शहरातील आरोग्यसेवेला मोठा हातभार लागणार आहे. या निधीच्या योग्य नियोजनामुळे रुग्णालयातील रुग्णांच्या प्रकृतीची विशेष काळजी घेऊन, पूर्णपणे स्वच्छता व नियमांचे पालन करत हलका, ताजा आणि घरगुती पद्धतीचा सात्विक आहार उपलब्ध होणार आहे. तसेच, दूरवरून उपचारासाठी आलेल्या आणि आर्थिक अडचणीत असलेल्या रुग्णांच्या कुटुंबीयांना बाहेर जेवणासाठी वणवण फिरावे लागू नये, यासाठी हा उपक्रम अतिशय मोलाचा आधार ठरणार आहे. भगवंताचा हा पवित्र प्रसाद रुग्णांना मानसिक स्थैर्य आणि लवकर बरे होण्यासाठी आवश्यक असलेली सकारात्मक ऊर्जा प्रदान करेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
शहराच्या सर्वांगीण विकासासोबतच नागरिकांचे आरोग्य आणि सामाजिक स्वास्थ्य जपण्यासाठी महापालिका कटिबद्ध आहेच, परंतु जेव्हा सीएसआर फंडाच्या माध्यमातून अशा लोककल्याणकारी उपक्रमांमध्ये धार्मिक व सामाजिक संस्था पुढे येतात, तेव्हा समाजसेवेचे काम अधिक व्यापक होते, असे सांगत स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी इस्कॉन संस्था, सीएसआर अंतर्गत सहकार्य करणाऱ्यांचे आणि निस्स्वार्थ भावनेने सेवा देणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले.
“थेरगाव हॉस्पिटलमधील रुग्णांसाठी आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या नातेवाईकांसाठी इस्कॉन संस्थेने सीएसआर फंडाच्या माध्यमातून सुरू केलेल्या सात्विक भोजनाच्या (प्रसाद) उपक्रमाचा शुभारंभ करताना मला आनंद आहे. आजारपणाच्या कठीण काळात जेव्हा रुग्णाला घरगुती आणि पौष्टिक आहाराची गरज असते, तेव्हा हा उपक्रम त्यांना मोठा मानसिक आणि शारीरिक आधार देणारा आहे. ‘सेवा हीच ईश्वर सेवा’ या भावनेतून चालविल्या जाणाऱ्या आणि सीएसआरच्या माध्यमातून बळकट होणाऱ्या अशा लोककल्याणकारी उपक्रमांना पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आणि माझ्या वैयक्तिक पातळीवरून नेहमीच संपूर्ण सहकार्य व पाठबळ आहे.” – अभिषेक बारणे, सभापती – स्थायी समिती, पिंपरी चिंचवड महापालिका…


















