- सुनिता पाटील आणि वंदना बहिरट यांची कैलास मानसरोवर यात्रा सुखरूप पूर्ण; माहेरी भावूक स्वागत!…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १९ सप्टेंबर २०२६) :- नेपाळ चीन सीमेवरील मेनगेट तसेच नेपाळ सीमावर्ती भागामध्ये झालेल्या भीषण दुर्घटनेमुळे संपूर्ण देश आणि महाराष्ट्रात चिंतेचे ढग जमा झाले होते. महाराष्ट्रातील अनेक यात्रेकरूंच्या सुरक्षिततेबद्दल सर्वत्र प्रार्थना केली जात असतानाच, रावेत प्राधिकरण परिसरातून एक अत्यंत दिलासादायक आणि सुखद वृत्त समोर आले आहे. सुनिता प्रमोद पाटील व वंदना राजेंद्र बहिरट या दोन्ही सख्ख्या बहिणींनी अत्यंत खडतर आणि आव्हानात्मक मानली जाणारी कैलास मानसरोवर तीर्थयात्रा कोणत्याही विघ्नाशिवाय यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे. त्या सुखरूप माहेरी परतल्याने पाटील व बहिरट कुटुंबासह संपूर्ण परिसराने सुटकेचा श्वास सोडला आहे. सुभाष वैद्य गुरुजी, ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली खडतर कैलास मानसरोवर यात्रा पूर्ण करण्यात आली.
माहेरी आगमन होताच दोन्ही भगिनींचे नातेवाईक, मित्रपरिवार आणि परिसरातील नागरिकांनी पारंपरिक पद्धतीने औक्षण करून अत्यंत भावूक वातावरणात स्वागत केले. या प्रसंगी दोन्ही बहिणीच्या ओटीभरणाचा व पादयपूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे आयोजन भावजायी रुपाली विजयकुमार पाटील यांनी केले. मंगला साळुंखे, अलका पाटील, विजया पाटील, सोनल मुळे जहागीरदार,अंकिता धनके पाटील यांनी त्यांचे माहेरी स्वागत केले.
या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या स्वागत सोहळ्यात पाटील आणि बहिरट यांनी मानसरोवर यात्रेदरम्यानचे आपले थरारक आणि भक्तीमय अनुभव उपस्थितांसमोर मांडले. नेपाळमधील प्रतिकूल हवामान, कठीण रस्ते, डोंगररांगा आणि अत्यंत कमी प्राणवायू (ऑक्सिजन) असलेल्या वातावरणात केवळ दृढ इच्छाशक्ती आणि भोलेनाथांवरील अढळ श्रद्धेमुळेच आम्ही हा प्रवास पूर्ण करू शकलो, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. त्यांचा हा प्रवास ऐकताना उपस्थित नागरिकही भावूक झाले होते.
नेपाळ दुर्घटनेतील मृत भाविकांना श्रद्धांजली…
आपल्या दोन्ही लेकी सुखरूप परतल्याचा आनंद साजरा करत असतानाच, दोन्ही कुटुंबांनी सामाजिक भान आणि संवेदनशीलता जपली. नेपाळमधील दुर्दैवी अपघातात प्राण गमावलेल्या महाराष्ट्रातील आणि देशातील सर्व निष्पाप प्रवासी भक्तांना या कार्यक्रमात अत्यंत जड अंतःकरणाने श्रद्धांजली वाहण्यात आली. उपस्थित सर्व नागरिक आणि नातेवाईकांनी दोन मिनिटे स्तब्धता पाळून मृत आत्म्यांना ईश्वर चरणी स्थान मिळो, अशी प्रार्थना केली.

















