- उन्नती सोशल फाउंडेशनच्या सांस्कृतिक उपक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २१ सप्टेंबर २०२६) :- सामाजिक आणि राजकीय बांधिलकीसोबतच परिसरातील सांस्कृतिक चळवळीला बळ देण्याच्या उद्देशाने पिंपळे सौदागर येथील उन्नती सोशल फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘स्वर निनाद’ या संगीत मैफिलीला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रविवार (दि. २०) रोजी सायंकाळी उन्नतीच्या प्रांगणात झालेल्या या मैफिलीत शास्त्रीय, सुगम आणि चित्रपट गीतांच्या सादरीकरणाने वातावरण सुरेल झाले.
गीतकार, संगीतकार आणि गायिका म्हणून परिचित असलेल्या भारती न्यायाधीश तसेच त्यांच्या शिष्य कलावंतांनी विविध गीतांचे सादरीकरण केले. मैफिलीची सुरुवात ‘आले रे गणपती आज दारी रे’ या गणेशस्तवनाने झाली. त्यानंतर हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या यमन, भूप, बिहाग, काफी आणि भीमपलास या रागांमधील बंदिशींनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्यानंतर सुगम संगीत आणि चित्रपट गीतांच्या सादरीकरणाने मैफिलीची रंगत अधिकच वाढली.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विधी समितीच्या सदस्या तथा प्रभागातील नगरसेविका डॉ. कुंदाताई भिसे यांनी संत तुकाराम महाराजांची ‘ओंकार प्रधान रूप गणेशाचे’ ही रचना सादर केली. त्यांच्या गायनाला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली.
मैफिलीत इरा, शौर्यवी, राघवी, ध्वनी, अथर्व, आस्मी, ओजस्वी, पयोधी, सौम्या, गार्गी आणि श्रीयान या बालकलावंतांसह सुलभा माने, प्रभा बसवंते, रेखा देवपूरकर, सुचिता सिदनाळे आणि सुनीता सावळे या ज्येष्ठ महिला शिष्य कलावंतांनी विविध गीते सादर केली. तबल्यावर चैतन्य डांगे, तर संवादीनीवर भारती न्यायाधीश यांनी साथसंगत केली. मैफिलीचे निवेदन भामिनी महाले यांनी केले.
कार्यक्रमाच्या समारोपाला भारती न्यायाधीश यांनी ‘वंदे मातरम्’ सादर केले. यावेळी उन्नती सोशल फाउंडेशनचे संस्थापक संजय भिसे, डॉ. कुंदाताई भिसे, पिंपरी-चिंचवड कल्चरल फाउंडेशनचे अध्यक्ष विजय भिसे आणि उद्योजक धनंजय भिसे यांच्या हस्ते सर्व कलावंतांचा सत्कार करण्यात आला.

















