न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी | २२ सप्टेंबर २०२६ :- पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील मोठ्या प्रमाणात मालमत्ता कर थकीत असलेल्या मालमत्तांवर ३० सप्टेंबरनंतर जप्तीची कारवाई करण्याचे निर्देश आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले. औद्योगिक, बिगरनिवासी, मिश्र तसेच इतर मोठ्या थकबाकीदार मालमत्तांवर प्राधान्याने कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
कर आकारणी व कर संकलन विभागाच्या आढावा बैठकीत मालमत्ता कर वसुली, थकबाकी, नवीन मालमत्तांची कर आकारणी आणि प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेण्यात आला. यावेळी अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, उपायुक्त सचिन पवार, प्रशासन अधिकारी व सहायक मंडलाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, ऑनलाइन मालमत्ता कर भरणाऱ्या नागरिकांना सामान्य करात ४ टक्के सवलत देण्यात आली असून, ३० सप्टेंबर ही सवलतीची अंतिम तारीख आहे. आतापर्यंत ५९२ कोटी ७४ लाख रुपयांचा मालमत्ता कर संकलित झाला आहे. नागरिकांनी मुदतीपूर्वी कर भरून सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

















