न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड | २२ सप्टेंबर २०२६ :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाने पुनावळे येथील ताथवडे रोड, विष्णूदेव नगर परिसरातील अनधिकृत जाहिरात फलकावर कारवाई केली. मंगळवारी (दि. २२ सप्टेंबर) ४०×३० आकाराचा हा जाहिरात फलक लोखंडी स्ट्रक्चरसह निष्कासित करण्यात आला.
महापालिकेची पूर्वपरवानगी न घेता खासगी जागेत जाहिरात फलक उभारणे नियमबाह्य आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील नियम २४४, २४५ तसेच महाराष्ट्र महानगरपालिका (आकाशचिन्ह व स्कायसाईन) व जाहिरात प्रदर्शित करण्याचे नियमन व नियंत्रण नियम २०२२ नुसार परवानगी आवश्यक आहे.
शहरातील अनधिकृत जाहिरात फलकांमुळे विद्रुपीकरण होत असल्याने महापालिकेने त्यांच्याविरोधात मोहीम सुरू केली आहे. यापूर्वी ताथवडे, थरमॅक्स चौक, समर्थ सहकारी बँकेची इमारत तसेच चोवीसावाडी परिसरातील फलक हटविण्यात आले आहेत.
उपायुक्त (परवाना) राजेश आगळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. अनधिकृत फलक उभारल्यास ते तात्काळ निष्कासित केले जातील, असा इशारा महापालिकेने जाहिरात एजन्सींना दिला आहे.

















