न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. २६ सप्टेंबर २०२६) :- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे (MPSC) अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्यासह विद्यार्थ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी २ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता एस. एम. जोशी पूल, नवी पेठ येथे बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात येणार आहे. यापूर्वी २७ सप्टेंबरला आंदोलन प्रस्तावित होते; मात्र तांत्रिक कारणांमुळे पोलिसांनी त्यास परवानगी नाकारली. २ ऑक्टोबरला आंदोलनास परवानगी देण्यास पोलिसांनी सहमती दर्शविली आहे.
आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीत विद्यार्थी प्रतिनिधी आणि पोलिस आयुक्त यांच्यात बैठक झाली. अध्यक्षांच्या राजीनाम्यासह पेपरफुटी रोखणे आणि विद्यार्थ्यांच्या इतर मागण्यांवर आंदोलनकर्ते ठाम आहेत.
येत्या दोन दिवसांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत विद्यार्थी प्रतिनिधींची बैठक होणार आहे. रोहित पवार यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला असून, काँग्रेस नेते डॉ. विश्वजीत कदम यांनीही विद्यार्थ्यांच्या मागण्यांना समर्थन दिले. गरज पडल्यास राहुल गांधी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पुण्यात उपस्थित राहू शकतात, असे कदम यांनी सांगितले. बैठकिला विविध पक्षांचे नेते आणि विद्यार्थी प्रतिनिधी उपस्थित होते.


















