- निगडी बस डेपो परिसरात आढळून आला मृतदेह…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २६ सप्टेंबर २०२६) :- पिंपरी-चिंचवड पोलिस दलातील कर्मचारी विजय कोळी यांचा मृतदेह शनिवारी सकाळी निगडी ट्रान्सपोर्ट नगर येथील बस डेपो परिसरात आढळून आल्याने पोलिस दलात खळबळ उडाली.
कोळी हे मागील दोन दिवसांपासून बेपत्ता होते. प्राथमिक माहितीनुसार, त्यांनी शासकीय पिस्तुलातून स्वतःवर गोळी झाडल्याचे समोर आले आहे.
विजय कोळी हे पिंपरी-चिंचवड पोलिस दलात कार्यरत असून वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे RTPC म्हणून सेवा बजावत होते. कौटुंबिक कारणातून ते घरातून निघून गेल्याची माहिती आहे. घराबाहेर पडताना त्यांनी शासकीय पिस्तूल सोबत नेल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू करण्यात आला.
कोळी यांचे शेवटचे लोकेशन निगडी परिसरातील दुर्गादेवी टेकडी येथे मिळाल्याने पोलिसांनी या भागात शोधमोहीम हाती घेतली होती. शोधकार्यात ड्रोनचाही वापर करण्यात आला. मात्र, दोन दिवसांच्या प्रयत्नांनंतरही त्यांचा ठावठिकाणा लागला नव्हता.
दरम्यान, शनिवारी सकाळी ट्रान्सपोर्ट नगर येथील बस डेपो परिसरात कोळी यांचा मृतदेह आढळून आला. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत पंचनामा व पुढील तपासाची कार्यवाही सुरू केली. प्राथमिक तपासात शासकीय पिस्तुलातून डोक्यात गोळी लागल्याचे निष्पन्न झाले असून, घटनेमागील नेमके कारण तपासातून स्पष्ट होणार आहे.
या घटनेमुळे पिंपरी-चिंचवड पोलिस दलात हळहळ व्यक्त होत असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.


















