- गणेश विसर्जनात २ टन निर्माल्य संकलन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २६ सप्टेंबर २०२६) :- आकुर्डी, प्राधिकरण, रावेत आणि पूर्णानगर भागात स्वयंसेवकांनी बजावलेल्या चोख सेवेमुळे यंदाच्या १२ दिवसांच्या गणेशोत्सवाची अत्यंत सुरक्षित आणि यशस्वी सांगता झाली. प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे विशेष पोलीस अधिकारी (SPO) आणि पोलीस मित्रांनी या काळात प्रशासनाला मोलाचे सहकार्य केले. गणेश भक्तांच्या सुलभ विसर्जनासोबतच पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश देत स्वयंसेवकांनी गणेश तलाव, वाल्हेकरवाडी आणि पूर्णानगर विसर्जन घाटावरून तब्बल २ टन निर्माल्य संकलित केले.
या सामाजिक आणि पर्यावरणपूरक उपक्रमात समितीचे प्रमुख एसपीओ विशाल शेवाळे, राम सुर्वे, सतिश देशमुख, तेजस सकट, शिल्पा हेरलगी, रेणुका ईलकल, कल्पना थोरात, विजया बनसोडे, प्रणिता मतकर, अनिल मोरे, संजय गोरखा, चंद्रशेखर पुजारी आणि उमेश देशमुख यांनी पुढाकार घेऊन निर्माल्य संकलनाची धुरा सांभाळली.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर यांनी सर्व एसपीओंच्या या समर्पित सेवेचे विशेष कौतुक केले. तसेच, यंदाच्या गणेशोत्सवात पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर आणि वाहतूक उपायुक्त विक्रांत देशमुख यांनी स्वयंसेवकांना विसर्जन बंदोबस्ताबाबत विशेष मार्गदर्शन केले होते.
समितीचे अध्यक्ष डॉ. विजयकुमार पाटील यांनी स्वयंसेवकांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की, “गेल्या २४ वर्षांपासून प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे एसपीओ आणि स्वयंसेवक दरवर्षी गणेश भक्तांना विसर्जन सोहळ्यात आणि पोलीस प्रशासनाला बंदोबस्तामध्ये सातत्याने सहकार्य करत आहेत. यंदा १२ दिवसांचा गणेशोत्सव असल्याने शेवटच्या दिवशी संपूर्ण वातावरण अत्यंत भक्तिमय झाले होते. प्राधिकरणातील गणेश तलाव परिसराची स्वच्छता राखण्यासाठी समितीच्या स्वयंसेवकांनी या वर्षी घेतलेला पुढाकार खरोखरच कौतुकास्पद आहे.”
पोलीस प्रशासन आणि स्वयंसेवकांच्या या सुनियोजित समन्वयामुळे शहरातील महत्त्वाच्या विसर्जन घाटांवर शिस्तबद्धता पाहायला मिळाली आणि परिसराची स्वच्छताही राखली गेली.
पोलीस निरीक्षक हृषिकेश घाडगे, निता गायकवाड, पो.उपरिक्षक रवींद्र आहेरराव, एलआयबी पोलीस दयानंद देवकर यांनी स्वयंसेवकांना विसर्जन बंदोबस्त मार्गदर्शन केले.


















