न्यूज पीसीएमसी नेटवर्क
भोसरी (दि. २६ सप्टेंबर २०२६) :- उन्नती फिनसर्व प्रा. लि.च्या भोसरी शाखेत गोल्ड लोन अधिकारी म्हणून काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने ग्राहकांकडून कर्ज खाते बंद करण्यासाठी रोख स्वरूपात घेतलेली रक्कम कंपनीकडे जमा न करता स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी वापरल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात कंपनीचे तब्बल ३५ लाखांपेक्षा अधिकचे आर्थिक नुकसान झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
हा प्रकार मे २०२३ ते फेब्रुवारी २०२६ या कालावधीत घडल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी सुयोग संजय गायकवाड (वय ३०, रा. नवी मुंबई) यांनी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
फिर्यादीच्या माहितीनुसार, आरोपी अक्षय धर्मराज महामुलकर हा संबंधित फायनान्स कंपनीत गोल्ड लोन अधिकारी म्हणून कार्यरत होता. त्याने ग्राहकांकडून कर्ज खाते बंद करण्यासाठी आवश्यक रक्कम रोख स्वरूपात स्वीकारली. मात्र, ही रक्कम कंपनीकडे जमा न करता स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी वापरल्याचा आरोप आहे. त्यामुळे कंपनीचे मोठे आर्थिक नुकसान झाले. याप्रकरणी भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक टापरे करीत आहेत.

















