- आमदार अमित गोरखेंच्या नेतृत्वात अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणासाठी निर्णायक एल्गार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २७ सप्टेंबर २०२६) :- अनुसूचित जातीच्या (SC) आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करून मातंग समाजासह इतर वंचित घटकांना शिक्षण, रोजगार आणि शासकीय नोकऱ्यांमध्ये समान संधी मिळावी, या प्रमुख मागणीसाठी २९ सप्टेंबर रोजी मुंबईत ‘निर्धार मोर्चा’ काढण्यात येणार आहे. आमदार अमित गोरखे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा मुंबईतील आझाद मैदानावर आयोजित करण्यात आला आहे.
अनुसूचित जातीच्या आरक्षणाचा लाभ सर्व घटकांना समान प्रमाणात मिळावा, तसेच आरक्षणापासून अपेक्षित लाभ न मिळालेल्या वंचित घटकांना न्याय मिळावा, या मागणीसाठी राज्यभरात आतापर्यंत ७५ हून अधिक मोर्चे आणि आंदोलने करण्यात आल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले. त्यानंतर आता २९ सप्टेंबर रोजी मुंबईत ‘निर्धार मोर्चा’ काढण्यात येणार आहे.
आरक्षणाच्या उपवर्गीकरणाबाबत बोलताना आमदार अमित गोरखे म्हणाले, “आरक्षणाचा मूळ उद्देश सर्वांचा सर्वांगीण विकास हा आहे. मात्र, अनुसूचित जातीतील काही घटकांना अद्यापही आरक्षणाचा अपेक्षित लाभ मिळालेला नाही. शिक्षण, नोकरी आणि रोजगाराच्या संधींपासून कोणताही वंचित घटक दूर राहू नये, यासाठी आरक्षणाचे उपवर्गीकरण होणे गरजेचे आहे.”
मोर्चाच्या प्रमुख मागण्या..
अनुसूचित जातीच्या आरक्षणात उपवर्गीकरण लागू करून मातंग व इतर वंचित समाजघटकांना त्यांच्या हक्काचा वाटा मिळावा.
वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये समान संधी उपलब्ध करून द्याव्यात.
रोजगार आणि शासकीय नोकऱ्यांमध्ये उपवर्गीकरणाच्या आधारे न्याय्य प्रतिनिधित्व मिळावे.
आरक्षणाचा लाभ सर्व वंचित घटकांपर्यंत समान प्रमाणात पोहोचण्यासाठी आवश्यक धोरणात्मक निर्णय घ्यावेत.
या मोर्चामध्ये राज्यभरातून मातंग, मादिगा, बुरूड, चर्मकार यांसह विविध वंचित समाजघटक, सामाजिक संघटना, कार्यकर्ते, महिला आणि युवक मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचा दावा आयोजकांनी केला आहे.
“गेली अनेक वर्षे शांततापूर्ण मार्गाने विविध आंदोलने आणि मोर्चांच्या माध्यमातून शासनापर्यंत मागण्या पोहोचवण्यात आल्या आहेत. २९ सप्टेंबरचा मुंबईतील ‘निर्धार मोर्चा’ हा हक्क, अस्तित्व आणि न्यायासाठीचा निर्णायक लढा आहे,” असे आमदार अमित गोरखे यांनी सांगितले.


















