न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २७ सप्टेंबर २०२६) :- व्यवसायात झालेल्या नुकसानीमुळे निराश होऊन आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या भावाला विरोध केल्याने बहिणीचा गळा दाबून खून केल्याप्रकरणी आरोपी सुबोजित बासू याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तब्बल १६ वर्षांपूर्वी घडलेल्या या खून प्रकरणात हिंजवडी पोलिसांनी केलेल्या शास्त्रोक्त तपास आणि प्रभावी न्यायालयीन पाठपुराव्याला यश आले आहे.
हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत १४ एप्रिल २०१० रोजी पहाटे शिंदेनगर येथील अपराजिता सोसायटीमध्ये ही घटना घडली होती. आरोपी सुबोजित बासू याने व्यवसायातील नुकसानीमुळे निराश होऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याची बहीण प्रियदर्शिनी बासू (वय २३) हिने त्यास विरोध केला. त्यामुळे आरोपीने तिचा गळा दाबून खून केला. त्यानंतर स्वतःच्या डाव्या हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केला.
या प्रकरणी तत्कालीन तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक आर.टी. पवार यांनी घटनास्थळावरील पुरावे, साक्षीदारांचे जबाब आणि उपलब्ध अन्य पुराव्यांच्या आधारे तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या निर्देशानुसार हे प्रकरण ‘स्टार केस’ म्हणून निवडण्यात आले. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेळोवेळी प्रकरणाचा आढावा घेतला. ‘स्टार केस’ची जबाबदारी हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांच्याकडे देण्यात आली.
सरकारी अभियोक्ता लिना पाठक यांनी न्यायालयात सरकारची बाजू मांडली. पोलिसांनी साक्षीदारांना न्यायालयात हजर ठेवणे, मुद्देमाल सादर करणे, सी.ए. अहवाल प्राप्त करून घेणे तसेच सरकारी अभियोक्त्यांशी समन्वय साधून न्यायालयीन कामकाजाचा सातत्याने पाठपुरावा केला.
उपलब्ध पुरावे व साक्षीदारांचे जबाब विचारात घेऊन न्यायालयाने आरोपी सुबोजित बासू याला भादंवि कलम ३०२ अन्वये जन्मठेप आणि १० हजार रुपये दंड, तसेच दंड न भरल्यास एक महिन्याचा अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावली.


















