न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २७ सप्टेंबर २०२६) :- दिघी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा समांतर तपास करताना गुन्हे शाखा युनिट-३च्या पथकाने कौशल्यपूर्ण तपासाद्वारे गुन्ह्याचे सत्य उघडकीस आणले. घरातील सोन्या-चांदीचे दागिने चोरीला गेल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, तपासादरम्यान फिर्यादीच्या पत्नीनेच ते दागिने घरात लपवून ठेवल्याचे समोर आले.
दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. ६२१/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३१ (३), ३०५ (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या सूचनेनुसार गुन्हे शाखा युनिट-३चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे व पथक या गुन्ह्याचा समांतर तपास करीत होते.
तपासादरम्यान घटनास्थळाच्या आसपासचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. तसेच संबंधित मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण करण्यात आले. मात्र, इमारतीमध्ये बाहेरील व्यक्ती आल्याचे कोणतेही ठोस पुरावे मिळाले नाहीत. त्यामुळे पोलिसांनी शेजारील रहिवाशांकडे चौकशी केली.
त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे व पोलीस हवालदार युवराज बिराजदार यांनी फिर्यादीच्या पत्नीची सखोल चौकशी केली. चौकशीदरम्यान तिने पती सोन्या-चांदीचे दागिने विकून नवीन घर घेणार असल्याने ते दागिने विकले जाऊ नयेत, या कारणास्तव घरातच लपवून ठेवल्याचे सांगितले. त्यानंतर पंचांसमक्ष लपवून ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने काढून देण्यात आले. पोलिसांनी ते जप्त करून गुन्ह्याचा तपास पूर्ण केला.
ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे, पोलीस उपनिरीक्षक सुनील जावळे, भरत गोसावी तसेच पोलीस अंमलदार युवराज बिराजदार, शशिकांत नांगरे, दिलीप राठोड, नितीन गुंजाळ, निखिल फापाळे आणि स्वप्निल महाले यांनी केली. पुढील तपास दिघी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक वरे करीत आहेत.


















