- तिजोरीसह २८ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल लंपास..
- डिलिव्हरी विंडोचे लॉक तोडून अज्ञात चोरट्याने साधला डाव…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपळे सौदागर (दि. २७ सप्टेंबर २०२६) :- पिंपळे सौदागर परिसरातील हल्दीराम शॉपमध्ये चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. अज्ञात चोरट्याने दुकानाच्या डिलिव्हरी विंडोचे लॉक तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर दुकानातील गोदरेज कंपनीची तिजोरी आणि त्यातील रोख रक्कम असा एकूण २८ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.
याप्रकरणी महेश शिवाजी कदम (वय २६, व्यवसाय नोकरी, रा. कृष्णा पार्क सोसायटी, काळभोर नगर, चिंचवड) यांनी काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा रजि. क्र. ५५६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३१ (२), ३०५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ सप्टेंबर रोजी पहाटे दोन ते सकाळी नऊ वाजण्याच्या दरम्यान ही चोरी झाली. पिंपळे सौदागर येथील जगताप डेअरीजवळ असलेल्या स्पॉट १८ मॉलमधील हल्दीराम शॉप क्रमांक २/३ येथे चोरट्याने प्रवेश केला. दुकानाच्या डिलिव्हरी विंडोचे लॉक तोडून आत शिरल्यानंतर गोदरेज कंपनीची तिजोरी आणि त्यामधील रोख रक्कम १८ हजार ३०० रुपये चोरून नेण्यात आली.
चोरीला गेलेल्या तिजोरीची किंमत १० हजार रुपये असल्याने एकूण २८ हजार ३०० रुपयांची मालमत्ता चोरीस गेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर काळेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. परिसरातील उपलब्ध सीसीटीव्ही फुटेज तसेच इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे अज्ञात चोरट्याचा शोध घेण्यात येत आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चव्हाण करीत आहेत.


















