- गवळीमाथा भोसरीतील घटनेप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलिसांत गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
भोसरी (दि. २७ सप्टेंबर २०२६) :- किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून एका व्यक्तीच्या डोक्यात दगड मारून त्याला जखमी केल्याची घटना गवळीमाथा, भोसरी येथे घडली. याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलिसांनी एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी राजू पुरुषोत्तम गायकवाड (वय ३८, व्यवसाय मजुरी, रा. बंद पडलेली कंपनी, मारुती सुझुकी शोरूममागे, नेहरूनगर चौकाजवळ, एमआयडीसी भोसरी) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार ब्रुसली उर्फ जणम विक्रम शहा (वय अंदाजे ४०, रा. जे ब्लॉक, एमआयडीसी भोसरी) याच्याविरुद्ध एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. ७१७/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८ (१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ सप्टेंबर रोजी रात्री ११ ते १२ वाजण्याच्या दरम्यान कचरा डेपोसमोरील भंगार दुकानाजवळ, गवळीमाथा, भोसरी येथे फिर्यादी राजू गायकवाड आणि आरोपी ब्रुसली उर्फ जणम शहा हे दोघे गप्पा मारत बसले होते.
यावेळी दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. वादाचे रूपांतर भांडणात झाल्यानंतर आरोपीने रागाच्या भरात घटनास्थळी पडलेला दगड उचलून फिर्यादीच्या डोक्यात मारला. या हल्ल्यात गायकवाड यांच्या डोक्याला दुखापत झाली.
घटनेनंतर फिर्यादी यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.
या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक खडसे करीत असून, सहाय्यक पोलीस फौजदार गायकवाड तपासात सहकार्य करीत आहेत.

















