- मावळातील अपघातप्रकरणी टँकरचालकाविरुद्ध शिरगाव पोलिसांत गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
मावळ (दि. २७ सप्टेंबर २०२६) :- मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर धोकादायक पद्धतीने उभ्या केलेल्या टँकरला पाठीमागून कारने धडक दिल्याने झालेल्या अपघातात ३४ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना २६ सप्टेंबर रोजी सकाळी पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर, मावळ तालुक्यातील फूड मॉलच्या विरुद्ध बाजूस घडली.
या प्रकरणी साक्षी सुरेश धादोड (वय २२, व्यवसाय नोकरी, रा. मंत्रा मोनार्क, बालेवाडी) यांनी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार टाटा कंपनीच्या टँकरचा चालक रामेद्रकुमार (वय २८, रा. वडाळा ईस्ट, मुंबई) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचा भाऊ विराग सुरेश धादोड (वय ३४) हा कामावर जाण्यासाठी बलेनो कार (एमएच १२ व्हीएल ३७०९) घेऊन पुण्याहून मुंबईच्या दिशेने द्रुतगती मार्गावरून जात होता. सकाळी सुमारे ९.२५ वाजण्याच्या सुमारास फूड मॉलच्या विरुद्ध बाजूस पुणे-मुंबई मार्गावर टँकर (एमएच ४७ बीवाय ४६०२) धोकादायक स्थितीत उभा असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
द्रुतगती मार्गावर वाहने उभी करण्यास प्रतिबंध असतानाही आरोपी चालकाने कोणतेही पार्किंग किंवा धोक्याचे संकेत न लावता टँकर उभा केल्याचा आरोप आहे. त्यामुळे विराग धादोड यांच्या कारची टँकरला पाठीमागून जोरदार धडक बसली. या अपघातात विराग गंभीर जखमी झाले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तसेच कारचेही नुकसान झाले.
या प्रकरणी शिरगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०६ (१), ३२४ (५), मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक केंद्रे करीत आहेत.

















