- बनावट चावीने कारचे लॉक उघडून रोकड लंपास…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुनावळे (दि. १० ऑक्टोबर २०२६) :- पुनावळे येथे पार्क केलेल्या कारचे बनावट चावीने लॉक उघडून त्यातील ५० लाख रुपयांची रोकड चोरणाऱ्या दोघांना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अवघ्या आठ तासांत ताब्यात घेतले. पोलिसांनी दोन्ही आरोपींकडून चोरीला गेलेली संपूर्ण ५० लाख रुपयांची रक्कम हस्तगत केली आहे. गुन्हे शाखा युनिट-२, मालमत्ता विरोधी पथक आणि रावेत पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ ऑक्टोबर रोजी रात्री १०:५० ते १० ऑक्टोबर रोजी मध्यरात्री १२:१५ या कालावधीत पुनावळे येथील संदीप हॉटेलसमोरील सिमेंटच्या सर्व्हिस रोडवर एक कार पार्क करण्यात आली होती. या कारचे लॉक बनावट चावीने उघडून त्यामध्ये ठेवलेली ५० लाख रुपयांची बॅग चोरून नेण्यात आली. या प्रकरणी रावेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
चोरीच्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी गुन्हे शाखा आणि रावेत पोलिसांना गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश दिले. त्यानुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-२, मालमत्ता विरोधी पथक आणि रावेत पोलीस ठाण्याची स्वतंत्र पथके तयार करण्यात आली.
पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता, एक व्यक्ती बनावट चावीने कार उघडून त्यातील ५० लाख रुपये असलेली बॅग घेऊन जात असल्याचे दिसून आले. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत संशयितांचा शोध सुरू केला.
तपासादरम्यान, फिर्यादीसोबत मुंबईला पैसे आणण्यासाठी गेलेल्या दोन व्यक्तींपैकी चारुदत्त शिवाजी बेंडाले (वय ३०, रा. निघोजे) याच्यावर पोलिसांना संशय आला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने कारची बनावट चावी आपला मित्र प्रसाद शिवाजी बनकर (वय २९, रा. चिंबळी) याला दिल्याचे तपासात निष्पन्न झाले.
कारमध्ये ५० लाख रुपये असल्याची माहिती देऊन ही रक्कम चोरण्यास सांगितल्याचेही तपासात समोर आले. त्यानंतर पोलिसांनी प्रसाद बनकर याला चिंबळी येथून ताब्यात घेतले. दोन्ही आरोपींकडून चोरीस गेलेली संपूर्ण ५० लाख रुपयांची रक्कम हस्तगत करण्यात आली असून, त्यांना या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सहपोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड व बसवराज तेली, पोलीस उपआयुक्त रोहिदास पवार, परिमंडळ-२ चे पोलीस उपआयुक्त प्रदीप जाधव, गुन्हे-१ चे सहाय्यक पोलीस आयुक्त सुदर्शन राठोड आणि वाकड विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुन्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
गुन्हे शाखा युनिट-२ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप सावंत, मालमत्ता विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण, रावेत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ऋषिकेश घाडगे, पोलीस उपनिरीक्षक मयुरेश साळुंखे, राहुल खिळे तसेच पोलीस कर्मचारी विक्रम कुदळ, कृष्णा शितोळे, गोविंद चव्हाण, आशिष बोटके, गणेश सावंत, विनोद वीर, शामसुंदर गुट्टे आणि तांत्रिक विश्लेषण विभागाचे रमेश कारके यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

















