- स्वारगेट ते चऱ्होली फाटा प्रवासादरम्यान हातचलाखीने चोरी; दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
दिघी (दि. १० ऑक्टोबर २०२६) :- स्वारगेट ते चऱ्होली फाटा या मार्गावर पीएमपीएमएल बसने प्रवास करणाऱ्या महिलेच्या पाकिटातील सोन्याचे मंगळसूत्र, चांदीचे पैंजण आणि ओळखपत्र असा एकूण ३ लाख ४५ हजार ५०० रुपये किमतीचा ऐवज अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना ९ ऑक्टोबर रोजी दुपारी ३.३० ते सायंकाळी ५.२० वाजण्याच्या दरम्यान घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिला स्वारगेट येथून चऱ्होली फाट्याकडे पीएमपीएमएल बसने प्रवास करत होती. प्रवासादरम्यान अज्ञात चोरट्याने हातचलाखीने महिलेच्या पाकिटातील मौल्यवान ऐवज चोरून नेला. या ऐवजामध्ये सोन्याचे मंगळसूत्र, चांदीचे पैंजण आणि ओळखपत्राचा समावेश होता. चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दाखल केली.
या प्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वरे करीत आहेत.

















