- आमदार महेश लांडगे यांची आयुक्तांकडे मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १४ ऑक्टोबर २०२६) :- पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएम) संसर्गग्रस्त रुग्णांच्या शस्त्रक्रियांसाठी स्वतंत्र ‘सेप्टिक ऑपरेशन थिएटर’ तातडीने सुरू करावे, अशी मागणी आमदार महेश लांडगे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना निवेदन दिले आहे.
वाढत्या लोकसंख्येमुळे महापालिकेच्या आरोग्य सुविधांवरील ताण वाढत आहे. वायसीएम रुग्णालयात स्वतंत्र सेप्टिक ऑपरेशन थिएटर नसल्यामुळे संसर्गजन्य जखमा असलेल्या काही रुग्णांना अन्य रुग्णालयांत हलवावे लागते किंवा उपचारांसाठी विलंब होतो. त्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांना आर्थिक भार व मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचे लांडगे यांनी नमूद केले.
स्वतंत्र ऑपरेशन थिएटर उपलब्ध झाल्यास संसर्गजन्य, पूयुक्त आणि गंभीर जखमांवरील शस्त्रक्रिया रुग्णालयातच करणे शक्य होईल. तसेच संसर्ग नियंत्रण आणि रुग्णांची सुरक्षितता राखण्यास मदत होईल.
उपकरणे, मनुष्यबळासाठी निधी द्या…
सेप्टिक ऑपरेशन थिएटरसाठी आवश्यक जागा, वैद्यकीय उपकरणे, प्रशिक्षित मनुष्यबळ आणि निधीची व्यवस्था करावी. प्रस्तावाला प्रशासकीय व आर्थिक मंजुरी देऊन निश्चित कालमर्यादेत सुविधा सुरू करावी, अशी मागणी लांडगे यांनी केली आहे. सुविधा सुरू होईपर्यंत रुग्णांना सुरक्षित पर्यायी उपचार उपलब्ध करून द्यावेत, असेही त्यांनी म्हटले आहे.
“आर्थिक परिस्थितीमुळे कोणत्याही रुग्णाला उपचारांपासून वंचित राहावे लागू नये. वायसीएममध्ये स्वतंत्र सेप्टिक ऑपरेशन थिएटर सुरू करून रुग्णांना वेळेत आणि सुरक्षित उपचार मिळावेत. यासाठी महापालिका प्रशासनाने आवश्यक निधी, उपकरणे आणि प्रशिक्षित मनुष्यबळाची व्यवस्था करावी,” असे आमदार महेश लांडगे यांनी सांगितले.


















