न्यूज पीसीएमसी नेटवर्क
तळवडे (दि. १४ ऑक्टोबर २०२६) :- घरात एकट्या झोपलेल्या ६० वर्षीय महिलेच्या घरात घुसून तिघा चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवत तब्बल ५३ लाख ७० हजार रुपयांचा ऐवज लुटला. जोतिबानगर परिसरात मंगळवारी (दि. १३) मध्यरात्री एकच्या सुमारास ही घटना घडली. चोरट्यांनी महिलेचे हात-पाय बांधून त्यांना मारहाण केली.
भारती मारुती भालेकर (वय ६०, रा. जोतिबानगर, तळवडे) यांनी याप्रकरणी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भालेकर यांच्या घरामागील जागेत बांधकाम सुरू आहे. याच ठिकाणाचा वापर करून तीन चोरटे टेरेसवर पोहोचले. हॉलचा दरवाजा तोडून त्यांनी घरात प्रवेश केला. त्या वेळी भारती भालेकर पहिल्या मजल्यावर झोपल्या होत्या, तर त्यांचा मुलगा आणि सून खालच्या मजल्यावर होते.
चोरट्यांनी झोपेत असलेल्या भारती यांच्या अंगावर बसून त्यांचे हात-पाय बांधले. त्यांच्या तोंडावर साड्या टाकून मारहाण केली आणि चाकूचा धाक दाखवून घरातील ऐवज लुटला. यामध्ये ४८ लाख २५ हजार रुपये किमतीचे ६८ तोळे सोन्याचे दागिने, पाच लाखांची रोकड, ३० हजारांचे चांदीचे दागिने, दहा हजारांचा मोबाइल आणि पाच हजारांचे घड्याळ असा एकूण ५३ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी नेला.
घराच्या मागील बाजूस सुरू असलेल्या बांधकामाचा फायदा घेत चोरट्यांनी प्रवेश केल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे. सहायक पोलिस निरीक्षक राम गांगुर्डे पुढील तपास करीत आहेत.


















