- डीपी चोरीचे सहा गुन्हे उघड; गुन्हे शाखा युनिट-३ची कारवाई…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १५ ऑक्टोबर २०२६) :- पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या ग्रामीण भागात विद्युत डीपीमधील तांब्याच्या तारा चोरी करणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखा युनिट-३ ने पर्दाफाश केला आहे. चार वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या आरोपीसह तिघांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत डीपी चोरीचे सहा गुन्हे उघडकीस आणून ५ लाख ९१ हजार रुपये किमतीच्या तांब्याच्या तारा, चोरीसाठी वापरण्यात येणारे साहित्य आणि दुचाकी जप्त करण्यात आली आहे.
दिघी, आळंदी आणि चाकण पोलीस ठाण्यांच्या हद्दीत विद्युत डीपी चोरीचे गुन्हे दाखल झाले होते. या गुन्ह्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी आरोपींचा तातडीने शोध घेण्याच्या सूचना गुन्हे शाखा युनिट-३ ला दिल्या होत्या.
त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने समांतर तपास सुरू केला. दरम्यान, पोलीस अंमलदार दिलीप राठोड आणि बाळासाहेब खेडकर यांना गोपनीय बातमीदाराकडून विद्युत डीपीमधील तांब्याच्या तारा चोरी करणारे संशयित मरकळ-पिंपळगाव परिसरात आल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून दुचाकीवरून जाणाऱ्या तिघांना डीपी चोरीच्या साहित्यांसह ताब्यात घेतले.
सभाजित मुरलीधर गौतम जैस्वार (वय ४५), विनोद हरीराम जैस्वार (वय ४०) आणि मनिष महेंद्र प्रसाद (वय ३८), तिघेही उत्तर प्रदेशातील रहिवासी, अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्यांनी जुलफकार खान याच्या मदतीने मरकळ, पिंपळगाव आणि सोळू परिसरात विद्युत डीपी चोरीचे गुन्हे केल्याची माहिती समोर आली. जुलफकार खान हा मंतरवाडी, उंड्री परिसरातील असून त्याचा शोध सुरू आहे.
या कारवाईत आळंदी पोलीस ठाण्यातील सहा गुन्हे उघडकीस आले असून, या गुन्ह्यांमधील चोरीस गेलेला १०० टक्के मुद्देमाल जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सहपोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, पोलीस उपायुक्त (गुन्हे) रोहिदास पवार आणि सहायक पोलीस आयुक्त डॉ. सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील जावळे, भरत गोसावी आणि पोलीस अंमलदार युवराज बिराजदार, सोमनाथ बोऱ्हाडे, बाळासाहेब खेडकर, दिलीप राठोड, स्वप्निल महाले व अजित रुपनवर यांनी कारवाईत सहभाग घेतला.


















