- चारित्र्यावरील संशयातून पत्नीची हत्या; पतीसह चार आरोपींना अटक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
मोशी (दि. १५ ऑक्टोबर २०२६) :- मोशीतील बोऱ्हाडेवाडी येथील मंत्रा मोमेंट्स सोसायटीजवळ झालेल्या महिलेच्या निर्घृण खुनाचा एम.आय.डी.सी. भोसरी पोलिसांनी २४ तासांत उलगडा केला. या प्रकरणात मृत महिलेच्या पतीसह चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.
१२ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री २.३० वाजण्याच्या सुमारास कमर्शियल ऑफिस गाळा क्रमांक ७ समोर एका महिलेचा मृतदेह आढळला होता. तिच्या मानेवर व चेहऱ्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले होते. ओळख लपवण्यासाठी चेहराही विद्रूप करण्यात आला होता. याप्रकरणी भोसरी एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी गोपनीय बातमीदार आणि तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने मृत महिलेची ओळख प्रियंका आकाश कांबळे (वय ३०, रा. चिखली) अशी पटवली. तिचा पती आकाश ऊर्फ घाऱ्या कांबळे याला पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. या संशयातून त्याने साथीदारांच्या मदतीने हत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले.
या प्रकरणी आकाश कांबळे, प्रथम कांबळे, रोहित शिंदे आणि दिनेश वाघमारे यांना १३ ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथकाने ही कामगिरी केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक भोजराज मिसाळ करीत आहेत.


















